ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी
लातूर, 17 मार्च: भारतातील मोठ्या शहरांत कचऱ्याची गंभीर समस्या आहे. लातूरमध्येही कचऱ्याच्या समस्येने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. तर कचरा जाळला जात असल्याने वायू प्रदुषणात भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून याविरोधात पर्यावरण प्रेमींतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या विरोधात महापालिका प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केली असून दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
महापालिका प्रशासनाविरुद्ध अनोखं आंदोलन
लातूर शहरात कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे प्रदुषणात भर पडत आहे. मनपा पालकाची भूमिका नीटपणे निभावत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घनकचरा जाळणे गुन्हा असला तरी त्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे कचरा जाळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे, असा आरोप पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. मनपा प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही त्यांच्याकडून कारवाई होत नाही. याच्या निषेधार्थ ग्रीन लातूर टीमच्या सदस्यांनी अनोखं आंदोलन केलं. खाली डोकं वर पाय करत महापालिकेच्या भूमिकेचा निषेध नोंदवला.
प्रशासनावर जबाबदारी टाळल्याचा आरोप
लातूरमध्ये कचरा जाळण्याचे प्रकार घडल्याने प्रदुषण वाढत आहे. या विरोधात महापालिकेने दोघा अज्ञातांविरोधात कलम 278 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, कचरा जाळणारे महानगरपालिका प्रशासनास कोण आहेत? हे माहिती असतानाही अज्ञाताच्या विरोधात गुन्हे नोंद केला आहे. प्रशासन आपली जबाबदारी झटकण्याचा काम करते असून याबाबत योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी डॉक्टर पवन लढ्ढा यांच्याकडून करण्यात आली आहे.
लग्नासाठी हॉल बुक करण्याचं टेन्शन संपलं, थेट मंगल कार्यालयच येणार दारात! पाहा Video
घनकचरा जाळणे गुन्हा
घनकचरा जाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय उपद्रवी कृत्य म्हणून कलम 268, पाण्याजवळ कचरा पेटवला तर कलम 277 तसेच कलम 279 नुसार सुद्धा कचरा पेटवल्यानंतर कारवाई केली जाऊ शकते. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार कोणताही कचरा पालापाचोळा जाळण्यासाठी बंदी घातलेली आहे. कचरा जाळल्याने अनेक विषारी वायू दूर वातावरणात पसरत आहेत. यापासून कर्करोग, यकृताचे आजार, मलावरोध, अस्थमा, श्वसनावरोध, मेंदू विकार होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी कचरा न जाळण्याचे आवाहन लातूर शहरामध्ये करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air pollution, Latur, Local18