बेळगाव, 19 डिसेंबर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेऊनही सीमाभाग धगधगतच आहे. आज तर सिमावासीयांचा महामेळावा हाणून पाडत कानडी दडपशाही सीमावासीयांवर केली. याचे पडसाद लोकसभा आणि विधानसभेतही उमटले. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर सीमावसीयांनी त्याचे स्वागत करत सीमावासीयांचा त्रास कमी होईल, अशी आशा व्यक्त केली. मात्र, त्यांचा काही संघर्ष अद्याप संपलेला नाही.
महाराष्ट्रात येण्याचा एल्गार पुकारत आज सीमावासीयांनी महामेळावा आयोजित केला. त्याला परवानगीही दिली. मात्र, सकाळी मंडप जप्त करत पोलिसांनी दडपशाही करायला सुरुवात करत कानडी रूप पुन्हा दाखवून दिले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना घरातून उचलून आणून नजरकैदेत ठेवले. वर्षानुवर्षे दडपशाही सहन करणाऱ्या सीमावासीयांच्या अमित शहा यांच्या बैठकीनंतरच्या अपेक्षा या निमित्ताने पुन्हा फोल ठरल्या.
तर तिकडे सिमावासीयांना पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या धैर्यशील माने यांना बेळगावबंदी लागू करण्यात आली. तर हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीलाही सीमेवरच रोखण्यात आलं. मुश्रीफांनी तर कानडी दडपशाहीचा पाढा वाचत आपल्यावर लाठीचार्ज झाल्याचा आरोप केलाय. तर सीमावासीयांच्या पाठीशी हे सरकार नसून खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात जाण्याचे धाडस नसले तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका संजय पवार यांनी केली आहे.
हेही वाचा - बेळगावात संतप्त आदोलकांची घोषणाबाजी, केला हा आरोप तर कलम 144 लागू
बेळगावात आणि सीमेवर घडलेल्या घटनेचे पडसाद विधानसभा आणि लोकसभेतही उमटले. अरविंद सावंत यांनी लोकसभेचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले तर अजित पवार यांनी सरकारला याचा जाब विचारला. तर सत्ताधाऱ्यांची मात्र यामुळे चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळालं. धगधगता सीमाभाग केंद्राने हस्तक्षेप केल्यानंतर शांत होईल, अशी आशा होती. मात्र, त्याच्या उलट वातावरण याठिकाणी पाहायला मिळत असून सीमाभागाचे राजकारण न करता हा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Belgaum, Karnataka, Maharashtra politics