Home /News /maharashtra /

'मोदी-शहांआधी त्यांनी आम्हाला भिडावं', नारायण राणे यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान

'मोदी-शहांआधी त्यांनी आम्हाला भिडावं', नारायण राणे यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान

नारायण राणे यांनी कुडाळ इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलं आहे.

सिंधुदुर्ग, 27 नोव्हेंबर : भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर घणाघाती टीका केली आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांवर सूड उगवण्याची भाषा करण्याआधी हिंमत असेल तर आम्हाला भिडावं... आम्ही समर्थ आहोत,' असं खुलं आव्हान नारायण राणे यांनी कुडाळ इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलं आहे. 'मातोश्रीच्या आतील आणि बाहेरची सर्व गुपिते आम्ही काढू आणि ते थोड्याच दिवसात कळेल,' असं म्हणत नारायण राणे यांनी ठाकरे कुटुंबाला पुन्हा एकदा डिवचलं आहे. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत तुम्ही एक सूड काढाल तर आम्ही दहा काढू, असा इशारा भाजपला दिला आहे. त्यावर बोलताना राणे यांनी या मुलाखतीतवर सडकून टीका करत हे सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा पुनरुच्चार केला आहे. 'मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असताना तुमच्या कर्तृत्वाने खूप भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे तुमचे सहकारी आता आतमध्ये जात आहेत. त्यांना वाचवा. आम्हाला धमक्या देवू नका. हात धुवून मागे लागण्याच्या धमक्या कसल्या देता? आम्ही मागे लागलो तर तुम्हाला झोप येवून देणार नाही,' असा घणाघात नारायण राणे यांनी केला आहे. नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे? 'महाराष्ट्राला आव्हानं देणाऱ्यांना माझं म्हणणं आहे की, अशी आव्हानं देऊन तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीतच तर तुम्ही आम्हाला म्हणता ना हिंदुत्ववादी तर मग ठीक आहे. सूडचक्र तुमच्याकडे, आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आमच्याकडे पण चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो', असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिला होता.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Narayan rane, Uddhav thackeray

पुढील बातम्या