Home /News /maharashtra /

शिवरायांच्या 'स्वराज्या'साठी छत्रपती घराण्याचे दोन भाऊ एकत्र येणार? बोलका फोटो, राजकीय वर्तुळात खळबळ

शिवरायांच्या 'स्वराज्या'साठी छत्रपती घराण्याचे दोन भाऊ एकत्र येणार? बोलका फोटो, राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारीचा वाद उफळल्यानंतर संभाजीराजेंच्या समर्थकांचा एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये "इतिहासाची पुनरावृत्ती होणार. राज्यसभा नव्हे, संपूर्ण राज्यच घेणार. महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना. लक्ष्य 2024", अशा आशयाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.

पुढे वाचा ...
    कोल्हापूर, 29 मे : राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारीवरुन शिवसेना आणि छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे यांच्यात मोठा संघर्ष बघायला मिळाला. संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचं घोषित केलं होतं. त्यासाठी त्यांनी सर्वच पक्षांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. या दरम्यान त्यांचं शिवसेनेसोबत बोलणं झालं होतं. ते शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास तयार होते. पण शिवसेनेकडून शिवबंधन बांधण्याची अट ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या काही अटींवरुनच संभाजीराजेंनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपण राज्यसभेची निवडणूक लढणार नाही, असं घोषित केलं. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला, असा आरोप केला होता. या सगळ्या घडामोडींनंतर त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी दुसऱ्याच दिवशी प्रसारमाध्यमांसमोर येऊन संभाजीराजेंवर टीका केली. संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांबाबत बोललेलं आणि स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याबाबत घेतलेला निर्णय योग्य नसल्याचं शाहू महाराज स्पष्ट म्हणाले. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. छत्रपती घराण्यातील पिता-पुत्रांचं राजकारणाच्या बाबतीत एकमत नसल्याची बातमी या निमित्ताने समोर आली. पण आज छत्रपती घराण्याशी संबंधित एक चांगली आणि थोडी वेगळी बातमी समोर आली आहे. छत्रपती घराण्याचे सातारा गाधीचे वंशच शिवेंद्रराजे भोसले आणि कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे यांची भेट झाली आहे. त्यांच्या भेटीचा फोटो स्वत: संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. संभाजीराजे यांची ही भेट खूप महत्त्वाची आहे. कारण छत्रपती घराण्याच्या दोन्ही गादीच्या वंशजांकडे राज्यातील मराठा समाजाच्या खूप आशा आहेत. राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या ही खूप मोठी आहे. त्यामुळे छत्रपती घराण्याचे दोन्ही गादीचे वंशज एकत्र आले, त्यांनी राज्य आणि समाजासाठी एकत्र काम केलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं राजकीय समीकरण स्थापन होण्याची शंभर टक्के शक्यता मानली जाते. विशेष म्हणजे संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी स्वराज्य संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचं भविष्यात पक्षात रुपांतरही होऊ शकतं, असे स्पष्ट संकेत संभाजीराजेंनी आधीच दिले आहेत. विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण राज्य पिंजून काढलं आहे. त्यांनी अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या आहेत. याशिवाय दुर्गराज रायगडाच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं देखील शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींकडून कौतुक केलं जातं. या सगळ्या घडामोडी पाहता संभाजीराजे आणि शिवेंद्रराजे भोसेल यांची भेट तर झाली नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. दरम्यान, संभाजीराजे यांनी स्वत: फेसबुकवर शिवेंद्रराजेंसोबतचा भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी अचानक आपली भेट झाल्याचं म्हटलं आहे. "आज प्रवासादरम्यान आमचे बंधू छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अचानक भेट झाली. महामार्गावर असून सुध्दा गाडी ओव्हरटेक करून त्यांनी भेट घेतली व आपुलकीने चौकशी केली. आनंद वाटला. कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध असेच राहोत, हीच आई भवानी चरणी प्रार्थना", असं संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजे यांनी अशी प्रतिक्रिया दिली असली तरी या भेटीमागील काहीतरी गुपित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसं काही असेल तर आगामी काळात निश्चित सर्वांसमोर येईल. पण शिवरायांच्या स्वराज्यासाठी म्हणजेच महाराष्ट्रासाठी छत्रपती घराण्याचे दोन भाऊ एकत्र येऊन काम करत असतील तर त्यांचं स्वागत करायलाच हवं, अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. इतिहासाची खरंच पुनरावृत्ती होणार? दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारीचा वाद उफळल्यानंतर संभाजीराजेंच्या समर्थकांचा एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये "इतिहासाची पुनरावृत्ती होणार. राज्यसभा नव्हे, संपूर्ण राज्यच घेणार. महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना. लक्ष्य 2024", अशा आशयाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. या पोस्टरमध्ये संभाजीराजे यांचादेखील फोटो होता.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या