ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर, 28 जुलै: राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अतिमुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणचे गाव, रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. राज्यातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालीय. पूराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनही सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये धो धो पाऊस सुरुय. पूरस्थिती निर्माण झाली असून या पाण्यात अनेक नागरिक अडकले आहेत. अशातच पूराच्या पाण्यात एक व्यक्ती अडकल्याची घटना समोर आली आहे.
कोल्हापूरमध्ये वारणा नदी पात्रामध्ये पुराच्या पाण्यात एक व्यक्ती झाडावर अडकला. नदी पात्राच्या मध्यभागी झाडावर हा व्यक्ती अडकला असून यांचं दृश्यही समोर आलं आहे. या व्यक्तीचं नाव बजरंग खामकर असून वय 55 ते 60 वर्षापर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. बजरंग हे रात्री आठ वाजल्यापासून झाडावर अडकले होते. जिल्हा आपत्ती निवारण पथकाच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करुन त्यांना रेस्क्यू करण्यात आलं.
कोल्हापरूमधील पूराच्या पाण्यात झाडावर अडकली व्यक्ती, 8 तासांनंतर केलं रेस्क्यू#kolhapur #rain #news18lokmat pic.twitter.com/NAbBQFJu78
— News18Lokmat (@News18lokmat) July 28, 2023
दरम्यान, बजरंग हे पाण्यात का उतरले होते आणि ते झाडावर कसे अडकले हे अद्याप समोर आलं नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून नागरिकही त्रस्त झाले आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसामुळे अलर्टही दिला आहे.