साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 9 मे : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूरमध्ये वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत. शाहू महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तसंच त्यांचे विचार आणि कार्याला उजाळा देणे हा याचा उद्देश आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील उद्योजकांना शहराशी जोडणे, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे यासाठीही कृतज्ञता पर्व हा खास कार्यक्रम कोल्हापूरमध्ये सध्या होतोय. 14 मे पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात आंब्याची भरलेली जत्रा हे सर्वाचं आकर्षण ठरतंय.
काय आहे खास?
कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं ही जत्रा भरविण्यात आलीय. यामध्ये उत्पादकांचे आंबे थेट ग्राहकांना उपलब्ध होत आहेत. 'कोल्हापूरकरांना आंब्याच्या वेगवेगळ्या जाता पाहायला मिळाव्यात म्हणून या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. केशर, हापूस, पायरी, तोतापुरी या नेहमीच्या आंब्याप्रमाणेच तब्बल 52 जातींचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग,सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातील शेतकरी इथं विक्रीसाठी आले आहेत,' अशी माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे उपशहर व्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली.
अन्य कार्यक्रमांचीही पर्वणी
आंब्याची जत्रा कोल्हापुरकरांचं मुख्य आकर्षण ठरतीय. त्याचबरोबर इथं अन्य कार्यक्रमांचीही पर्वणी आहे. या ठिकाणच्या एका दालनात धान्यांपासून ते दागिन्यांपर्यंत विवध वस्तूंची विक्री करण्यात येतीय. त्याचबरोबर कृषी, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित जिल्ह्यातील ठिकाणांची माहितीही चित्रमय स्वरुपात देण्यात आलीय.
शाहू महाराजांनी उभारल्या अमूल्य वास्तू, कधी न पाहिलेले PHOTOS
दुपारच्या सत्रात माहितीपर मराठी आणि हिंदी चित्रपट तर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात येतंय. तसेच दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येतंय. इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅलिग्राफी, पेपरक्रफ्ट, माती शिल्प, चित्ररेखांकन व रंगकाम, ॲनिमेशन आदी बाबत माहितीपर सकाळच्या सत्रात घेण्यात येतीय. तसंच जुन्या शस्त्रांच्या प्रदर्शनामुळे इथं भेट देणाऱ्या सर्वांना ऐतिहासिक शस्त्रांचीही माहिती होत आहे.
कुठं पाहणार प्रदर्शन?
श्री शाहू मिल, पूर्वारंग, महालक्ष्मी नगर, राजारामपुरी, कोल्हापूर - 416001
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.