साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 9 फेब्रुवारी : मैत्री, प्रेम आणि लग्न असे टप्पे अनेकांनी अनुभवले आहे. यामधील लग्नापूर्वी आणखी एक संकल्पना सध्या वाढली आहे. ती म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. देशातील महानगरामध्ये 'लिव्ह इन' मध्ये राहण्याचे प्रकार जास्त आहेत. त्याचबरोबर आता लहान शहरांमध्येही याला सुरूवात झाली आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना काय कायदेशीर अधिकार असतात? त्यांनी काय काळजी घ्यावी? याबाबत कोल्हापूरच्या जिल्हा बार असोसिएशनचे सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय आहे संकल्पना?
भारतीय संस्कृती मध्ये विवाह हे एक पवित्र बंधन आहे. पण बंधनात अडकणे बऱ्याच वेळा तरुण-तरुणींना नकोसे वाटते. आपले आयुष्य स्वतंत्रपणे जगायची इच्छा असते. अशावेळी दोन प्रौढ व्यक्ती एकमेकांच्या पूर्ण सहमतीने लग्नविना एकत्र राहतात, यालाच सोप्या भाषेत लिव्ह इन रिलेशनशिप म्हंटले जाते.
कायदेशीर आधार काय?
ॲड. विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार लिव्ह-इन रिलेशनशिप हे कलम 21 अंतर्गत येते. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी असे हे कलम आहे. कोणत्याही व्यक्तीशी लग्न करण्यासाठीचे/कोणा बरोबरही लिव्ह इनमध्ये राहू शकण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार यामधून आपल्याला मिळतात.
Love Story : जोडीदाराचे डोळे जाणार हे माहिती असूनही 'त्यांनी' केलं लग्न! Video
कोणत्या अटी पूर्ण हव्या?
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारे जोडपे हे असले पाहिजे. मुलीचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त असायला हवे. जोडप्यातील दोघांचाही स्वच्छेनं तो निर्णय घेणं आवश्यक आहे. अविवाहित किंवा विवाहित जोडपी देखील लिव्ह इन् मध्ये राहू शकतात. मात्र. एकमेकांच्या विवाहाबद्दलची सर्व माहिती दुसऱ्या जोडीदाराला माहिती असणे तितकेच गरजेचे आहे, असे ॲड. विजयकुमार यांनी स्पष्ट केले.
काय आहेत अडचणी?
लिव्ह इन् रिलेशनच्या बाबतीत भारतीय कायदे प्रक्रियेत कोणत्याही कराराची तरतूद अद्याप करण्यात आलेली नाही. या प्रकारच्या संबंधांना काही अडचणी आहेत.
- सर्वात प्रथम भारतीय समाज व्यवस्थेने या लिव्ह इन् रिलेशनशिपला अजून स्वीकारलेले नाही. त्यामुळे राहत्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात.
-भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने देखील या अशा गोष्टीला विरोधच होत असल्याने समाजात वावरताना देखील समस्या येऊ शकतात.
- लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यातील एकमेकांच्या मालमत्तेवर असणाऱ्या हक्कांबद्दल कायद्याकडून कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही.
काय काळजी घ्यावी?
'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या जोडप्यात मुलींनाच जास्त प्रमाणात त्रास होत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे मुलींनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. बराच काळ लिव्ह इन् मध्ये राहताना मुलीला कोणता त्रास होत असेल, तर तिला देखील पत्नीप्रमाणेच घरगुती हिंसा कायद्यांतर्गत तक्रार करण्याचे अधिकार आहेत, असेही ॲड. विजयकुमार यांनी सांगितले.
मुल कायदेशीर असते?
लिव्ह इन् रिलेशनमध्ये राहत असताना कधी कधी त्या जोडप्याला अपत्य प्राप्ती देखील होऊ शकते. अशा वेळी त्या दोघांचे लग्न झाले नसले तरी देखील, ते मुल हे कायदेशीर ठरते. लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणे असणारे सर्व अधिकार त्या मुलाला मिळतात.
'लिव्ह इन' गुन्हा आहे?
लिव्ह इन् मध्ये राहणारे जोडपे हे प्रौढ असायला हवे. या जोडप्यांवर ते फक्त लिव्ह इनमध्ये राहतात म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही. अनेक न्यायालयीन निर्णयांनी अनेक प्रसंगी लिव्ह-इन रिलेशनशिपची वैधता सिद्ध केली आहे, अशी माहितीही विजयकुमार यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Law, Lifestyle, Local18, Relationship, Relationship tips