साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 4 मे : असे म्हटले जाते की, आयुष्यात आपल्याला एखादी तरी कला अवगत असावी. पण आजकाल काहीजण आपल्या कलेलाच आपले करिअर बनवून नाव आणि पैसा कमावत आहेत. कोल्हापूरचा प्रतिक देखील सध्या आपल्या अनोख्या कलेमुळे सर्वत्र नावाजला जात आहे. एखाद्या शुभप्रसंगी बऱ्याचदा मुली सुंदर अशा रांगोळ्या काढताना पाहायला मिळतात. पण याच रांगोळी काढण्याच्या कलेत प्रतिक पारंगत झाला आहे. कशी झाली सुरुवात? प्रतिक कांबळे हा 19 वर्षांचा आहे. कोल्हापूरच्या रिंगरोड येथील क्रांतीसिंह नाना पाटील नगर परिसरात तो राहतो. मानेलेल्या मोठ्या भावाकडून प्रतिकने या रांगोळी कलेचे ज्ञान मिळवले. रोहित हा प्रतिकचा घराशेजारचा मानलेला भाऊ. त्याच्याकडूनच प्रतिकला रांगोळीची आवड निर्माण झाली होती. प्रतिकचे शालेय शिक्षण कोल्हापूरच्या आयुर्विन ख्रिश्चन हायस्कूल या ठिकाणी पूर्ण झाले. त्यामुळे प्रतिकला गणपती बनवण्यासाठी उत्सुकता वाढू लागली आणि तो रोहित यांच्याकडे हळूहळू गणपती बनवण्यासठी शिकला. रोहित यांना देखील रांगोळी काढणे फेटे बांधणे मेहंदी काढणे अशा कला चांगल्या रीतीने अवगत होत्या. त्यांच्याकडून प्रोत्साहित होऊन प्रतिकने स्वतः देखील रांगोळी आर्टिस्ट होण्याचे ठरवले.
रांगोळी काढणे अवघड रांगोळी काढणे ही तशी कला मुलांसाठी थोडीफार अवघड आहे मात्र प्रयत्न आणि सातत्य यांच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने रांगोळी काढू शकतो. बरोबर आपल्या आवडत्या कलेवर प्रेम केल्यानंतर सर्व गोष्टी सोप्या बनून जातात, असे मत प्रतिकने व्यक्त केले आहे. प्रतिक कोणकोणत्या काढतो रांगोळी? मोठमोठ्या सुंदर रांगोळ्या काढणे हे प्रतिक अगदी सहजतेने करु शकतो. सध्या संस्कार भारती स्प्रेड रांगोळी चाळणीचा वापर करून काढलेली रांगोळी अशा पद्धतीच्या रांगोळ्या तो काढत असतो. या रांगोळी काढताना वापरलेली रंगसंगती आणि मुक्त पद्धतीने वापरलेली कला यामुळे या सर्व रांगोळ्या अत्यंत सुंदर आणि नयनम्रम्य दिसत असतात.
कोणकोणत्या ठिकाणी काढल्या आहेत रांगोळी? लोणावळा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, चेन्नई अशा देशभरातील विविध ठिकाणी प्रतिकने आपल्या हातून सुंदर अशा रांगोळ्या रेखाटल्या आहेत. आयुष्यात ज्या ठिकाणी जाण्याचा विचारही केला नसेल, अशा ठिकाणी जाऊन आपली कला सादर केल्याचे समाधान प्रतिक व्यक्त करतो. देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणांवरून रांगोळी काढण्यासाठी लोक बोलावतात. काय आहे प्रतिकची खासियत? मोठमोठ्या रांगोळ्या काढणे हे प्रतिकला सहज जमते मात्र त्यातही युट्युब वरून व्हिडिओज बघून आणि मानलेल्या भावाकडून माहिती घेत प्रतिकने स्प्रेड रांगोळी मध्ये नैपुण्य मिळवले आहे. काढलेली स्प्रेड रांगोळी ही बघतच राहण्यासारखी असते, अशी प्रतिक्रिया देखील रांगोळी बघणाऱ्यांपैकी कित्येकाने दिल्याचे प्रतिक सांगतो. संपर्क (प्रतिक कांबळे) : +917397810440