ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 29 जुलै : एकीकडे टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. टोमॅटोला सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे आता चोरही टोमॅटो चोरण्याच्या मागे लागले आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटना घडत आहेत. टोमॅटोचे दर वाढल्याने चोर चक्क भाजी मार्केट किंवा गोडाऊनमधून टोमॅटो चोरत आहेत. टोमॅटोचे दर गगनाला भिडले असताना चोरट्यांनी आता आपला मोर्चा टोमोटो कडे वळवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावात ही घटना घडली आहे. शेतकरी अशोक मस्के यांच्या शेतात टोमॅटोची चोरी झाली. शेतकऱ्यांनी चक्क झाडावरचे टोमॅटोच तोडून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वीस गुंठ्यातील 25 कॅरेट टोमॅटो चोरट्यानी तोडून नेले आहेत. सीसीटीव्ही असताना देखील अंधार आणि पावसाचा फायदा घेत चोरांनी चकवा दिला आहे. सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. अशा वेळी टोमॅटो चोरी होणं म्हणजे खूप गंभीर बाब म्हणावी लागेल. शेतकऱ्याने हा सगळा प्रकार पाहून डोक्यालाच हात लावला आहे. झाडावरचे टोमॅटो तर चोरीला गेले. आता टोमॅटो काढून मिळणारे पैसे हातचे गेल्याने शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न आहे. चोरांना लवकरात लवकर पकडावं अशी मागणी शेतकऱ्याने पोलिसांना दिली आहे.