दापोली, 27 ऑगस्ट : मागच्या अनेक दिवसांपासून वाद सुरू असलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्यासाठी हातोडा घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या आज (दि. 27) खेडमध्ये दाखल झाले आहेत. (kirit somaiya) दापोलीतील अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराच्या पैशातून बांधलेले अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवले असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. खेड येथे आज दाखल होताच शहरातील तीनबत्ती नाका येथे जाहीर भाषण करताना ते बोलत होते. त्यांनी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्यांनी हात वर करत हातोडा दाखवला.
यावेळी सोमय्या म्हणाले, महाराष्ट्रात फक्त घोटाळा, भ्रष्टाचार व दादागिरी करणारे सरकार होते. कोव्हिडमध्ये कमाई करायचे काम मंत्री आणि नेते करत होते. त्या पैशातून मंत्री अनिल परब समुद्र किनीरी रिसॉर्ट बांधत होते. त्यांनी या रिसॉर्टच्या रूपाने महाविकास आघाडीच्या घोटाळ्याचे प्रतीक बांधायचे काम केले आहे. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीर साई रिसॉर्ट वाचावे यासाठी प्रयत्न केले.
हे ही वाचा : शिवसेना आणि शंभाजी ब्रिगेडच्या युतीवर फडणवीसांनी 3 शब्दांत दिली प्रतिक्रिया, म्हणाले..
मात्र विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हे भ्रष्टाचाराचे प्रतीक रिसॉर्ट पडायचे आदेश दिले आहेत. त्यांनी व देवेंद्र फडणवीस यांनी मला हे रिसॉर्ट पडायचे काम तुम्ही सुरू करा असे सांगितल्याने, त्यांच्या आदेशाने मी तेथे जात आहे, असेही ते म्हणाले. हा रिसॉर्ट पाडण्यासाठी किरीट सोमय्यांनी काल ट्वीट करत माहिती दिली होती. दरम्यान या ट्वीटमुळे कालपासूनच जोरदार चर्चा रंगली होती. किरीट सोमय्या आज अनिल परबांचा बंगला पाडतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.
हे ही वाचा : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, महिलेला शिवीगाळ प्रकरण भोवणार?
भाजपा नेते किरीट सोमय्या दापोलीत दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. किरीट सोमय्या साई रिसॉर्ट पाहणीसाठी मुरुडकडे रवाना झाले आहेत. मुरुड ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सोमय्या म्हणाले. त्यानंतर कथित साई रिसॉर्टची पाहणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.