शिवाजी गोरे (रत्नागिरी) : शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या आज पुन्हा दापोलीत दाखल झाले होते. आज (दि.22) सकाळी दापोली पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर सोमय्या साई रिसॉर्टवर हातोडा मारण्यासाठी दापोलीत गेले खरे मात्र, प्रत्यक्षात त्यांनी दोन्ही हॉटेल वर हातोडा मारलाच नाही. अनिल परब यांचा मालकीचा साई रिसॉर्ट असल्याचे वारंवार किरीट सोमय्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोर्टाने या प्रकरणाला स्थगिती दिली आहे.
किरीट सोमय्या भला मोठा प्रतिकात्मक हातोडा घेऊन रिसॉर्ट पाडण्यासाठी आले होते दरम्यान ते रिसॉर्ट पाडणार का? याबाबत सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु सोमय्यांनी रिसॉर्टच्या बाहेरील काही अंतरावर गाडी पार्किंगसाठी लावण्यात आलेल्या टाइल्सवर प्रतीकात्मक हातोडा मारला अन् अवघ्या काही क्षणात ते तिथुन निघून गेले.
हे ही वाचा : ठाकरे-आंबेडकर एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विधानामुळे सस्पेन्स वाढला
मागच्या दोन दिवसांपासून सोमय्या म्हणत होते मी जाऊन रिसॉर्ट पाडणार परंतु त्यांनी अवघ्या काही तासातच त्यांनी पलटी मारल्याचे बोलले जात आहे. आपण हॉटेलवर नाही तर अनिल परब यांनी सरकारी जागेत केलेल्या बेकायदेशीर जागेवरील हातोडा मारल्याचा उल्लेख करत त्यांनी बोलण्याचे टाळले. यावर सोमय्यांनी केलेल्या गाजावाजाचा चांगलाच पचका झाल्याचे दापोलीत चर्चा सुरू होती.
यावर अनिल परब काय म्हणाले
दापोलीतील साई रिसॉर्टचे आज पाडकाम करण्यात येणार होते. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोर्टाने या कारवाईला स्थगिती दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी म्हटले की, आज कोर्टाने रिसॉर्टच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या रिसॉर्टला कोर्टाचे संरक्षण आहे.
हे ही वाचा : ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, जज म्हणतात ‘नॉट बिफोर मी’!
या रिसॉर्टचे बांधकाम करण्यासाठी शासनाने परवानगी दिली. त्यामुळे शासनाने परवानगी दिली असेल आणि ती चुकीचे असेल तर मालकाचा किती दोष आहे, हे तपासावे लागेल असे परब यांनी म्हटले. साई रिसॉर्टवर लावण्यात येणारा नियम हा सगळ्याच रिसॉर्टला लावावा लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
किरीट सोमय्या माझी बदनामी करत असल्याचा आरोप परब यांनी केला. जे शिंदे गटात गेलेत त्यांच्यावर बोलण्याची हिंमत सोमय्या यांच्यात नाही. नारायण राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी सोमय्या हातोडा घेऊन गेले नाहीत. सुभाष देशमुख यांचे घरदेखील अनधिकृत आहे. मात्र, सोमय्या तिकडे जाणार नाहीत. सोमय्या हे स्टंट नाही तर नौटंकी करत असल्याचे परब यांनी म्हटले.