मुंबई, 15 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलने विनयभंगाचा आरोप केला आहे, यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विनयभंगाच्या या आरोपांनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायचा इशारा दिला आहे. 72 तासांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सुडाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आहे. या सगळ्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजीनामा दिला का नाही, याची माहिती मला नाही, परंतू त्या महिलने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नियमानुसार गुन्ह्याची चौकशी करतील, तपास करतील. तक्रारीमध्ये तथ्य असेल, नसेल त्याप्रमाणे पोलीस पुढची कारवाई करतील. आमचं सरकार कुठेही राजकीय सुडभावनेने कारवाई केली नाही आणि करणारही नाही’, असं मुख्यमंत्री म्हणाले.
‘हे राज्य कायद्याचं आहे, नियमानुसार हे सरकार चालतं, कायद्याने चालतं. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं ठीक आहे, पण कायदा हातात घेणं, कुठल्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतलं जाणार नाही’, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.