नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 21 एप्रिल : साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण म्हणजे अक्षय्य तृतीया. यावर्षी अक्षय्य तृतीया 22 एप्रिल रोजी आहे. या दिवशी सोने खरेदी साठी जशी ग्राहकांची गर्दी असते. तसेच फळाचा राजा आंबा खरेदीला देखील मोठ्या प्रमाणावर सुरुवात होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरोघरी आमरसाचा बेत असतो. जालना शहरात देखील अक्षय्य तृतीयानिमित्त विविध जातींच्या आंब्याची आवक वाढू लागलीय. आंब्याचे दर देखील आता सर्व सामान्य ग्राहकांच्या आवक्यात येत आहेत. कोणकोणत्या जातींची आंबे बाजारात उपलब्ध झालेत आणि काय आहेत त्यांचे दर पाहुयात. कोणत्या प्रकारचे आंबे बाजारात? जालना शहरात विविध राज्यातून आंब्याची आवक सध्या वाढली आहे. यामुळे आंब्याच्या किंमतीमध्ये देखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जालना शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सिंधी बाजार परिसरात दशहरी, लालबाग, बदाम, केशर, मल्लिका, गावरान तसेच देवगडचा हापूस आंबा या जातींच्या आंब्याची आवक झाली आहे.
काय आहेत दर? दशहरी 120 केशर 140 लालबाग 70 बदाम 80 गावरान 120 मालिका 100 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. बाजारात सध्या लवकर येणाऱ्या जातीचे आंबे उपलब्ध झाली आहेत. यानंतर लंगडा, लंगडा चारकुलस, आम्रपाली, तोतापुरी जातीचे आंबे बाजारात उपलब्ध होतील. सध्या अक्षय्य तृतीया तसेच रमजान महिना यामुळे आंब्यांना चांगली मागणी आहे. यामध्ये देवगडच्या हापूस आंब्याला 600 रुपये प्रति डझन भाव मिळत आहे. परंतु वातावरण सतत बदलत असल्याने त्याचा विक्रीवर देखील परिणाम होत असल्याचे विक्रेते फेजल बागवान सांगतात. गावरान आंबा बाजारात दुर्मिळ गावरान आंब्याला शहरातील नागरिकांची मोठी मागणी असते. जास्त पैसे देऊन देखील गावरान आंबा खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र, ग्रामीण भागात देखील गावरान आंब्याच्या आमाराया नष्ट होत असल्याने गावरान आंबा बाजारात दुर्मिळ झाला आहे.
Akshay Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला कधी खरेदी करावं सोनं? पाहा पूजेचा आणि खरेदीचा मुहूर्त Video
वातावरणाचा अंदाज घेऊनच खरेदी मी आंबे खरेदी करण्यासाठी बाजारात आली आहे. सध्या दर बरे आहेत. पण आणखी कमी झाले तर आणखी लोक आंबे खरेदी करतील. वातावरण पण सतत बदलत आहे. त्यामुळे वातावरणाचा अंदाज घेऊनच खरेदी करत आहे. कारण खराब हवामानात आंबे खाल्ल्यास आजारी पण पडू शकतो. सध्या मी 2 किलो आंबे घेतले आहेत. केशर आंबे मला 140 रुपये किलो तर बदाम 80 रुपये किलो मिळाल्याचे ग्राहक प्रेमिला चव्हाण यांनी सांगितले.

)







