जालना, 10 मार्च : राज्यात यंदा दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियान प्रशासनाकडून राबवण्यात येतंय. मात्र अनेक ठिकाणी कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. जालन्यातल्या सेवलीत तर चक्क शिक्षकांना धमकी देण्याचे प्रकार समोर आले आहेत. कॉपी करू द्या, अन्यथा जीवे मारू अशी धमकीच विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांकडून दिली जात असल्यानं शिक्षक धास्तावले आहेत. कॉपी करू द्या, अन्यथा जीवे मारु अशी धमकीच थेट कॉपी बहाद्दरांनी शिक्षकांना दिल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातल्या सेवली येथे घडलाय. सेवली या ठिकाणी दोन परीक्षा केंद्र आहेत. दहावी, बारावीचे मिळून याठिकाणी जवळपास अकराशे परीक्षार्थी आहेत. कॉपी सेंटर असा शिक्का बसल्याने याठिकाणी गोंधळ असतो. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी याठिकाणी धाड टाकली. यावेळी तब्बल 16 कॉपीबहाद्दरांना पकडलं होतं. त्यामुळं कॉपी बहाद्दरांचे धाबे दणादणे होते. ई-पॉस विचारतंय शेतकऱ्यांची जात, नव्या अपडेटनंतर बळीराजा संतप्त अचानक सगळं कडक झाल्यानं परीक्षार्थी घाबरले होते. त्यामुळं बुधवारच्या इंग्रजीच्या पेपरला परीक्षार्थींच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत शाळेवर दगडफेकही केली. इतकंच नाही तर कॉपी करु द्या, नसता तुम्हाला जीवे मारु अशा धमक्याही दिल्या. त्यामुळं धास्तावलेल्या शिक्षकांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणीचं थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय यंदाच्या परीक्षा या कॉपी मुक्त व्हाव्या यासाठी प्रशासनाकडून कॉपी मुक्त अभियान राबवलं जातंय. यासाठी बैठे पथकांसह फिरत्या पथकांचीही नेमणूक करण्यात आलीय. मात्र यालाही न जुमानता कॉपी बहाद्दरांची दादागिरी इतकी वाढलीय की थेट शिक्षकांनाच जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी कारवाई करत परीक्षा केंद्रांना संरक्षण देण्याची गरज असल्याचं शिक्षकांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.