नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 22 मे : जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर आयुष्यात पाहिलेली स्वप्न पूर्ण होऊ शकतात. जालना जिल्ह्यातल्या भाटेपुरी या गावातील मुलांनी हे दाखवून दिलंय. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये या गावातील 6 जणांची पोलीस भरतीमध्ये निवड झालीय. यामध्ये 4 मुली आणि 2 मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यापैकी 3 मुली एकाच कुटुंबातील आहेत. ग्रामीण भागातील अनेक तरूणांचं पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न असतं. त्यासाठी त्या खडतर परिश्रम घेतात. वाढत्या स्पर्धेमुळे यामधील मोजकेच विद्यार्थी यशस्वी होतात. पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भगवान सोनटक्के या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्या दोन मुली (सोनू सोनटक्के आणि सविता सोनटक्के ) तसंच सुनबाई शारदा यांची पोलीस भरतीमध्ये निवड झालीय. एकाच कुटुंबातील तीन जणांची पोलीस भरतीमध्ये निवड झाल्यानं सोनटक्के कुटुंबीयांसाठी आनंदानं आकाश ठेंगणं झालंय.
शारदा सोनटक्के यांचे २०१९ मध्ये गावातीलच बद्री सोनटक्के यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्यांनी पोलीस दलामध्ये भरती होण्याचं स्वप्न पतीला बोलून दाखवलं. शारदा यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बद्री यांनी पूर्ण साथ दिली. त्यामुळे खाकी वर्दी मिळवण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालंय. त्याचबरोबर त्यांच्याच घरातील सोनू आणि सविता यांनीही पोलीस भरतीचं मैदान मारलंय. या तिघांशिवाय गीता कचरे ही गावातील गरीब शेतकऱ्याची मुलगी वयाच्या 19 व्या वर्षीच पोलीस झालीय. तर सचिन कवळे आणि कचरू वाघमारे या भाटेपुरी गावातील मुलांचीही पोलीस भरतीमध्ये निवड झालीय. 3 महिन्यांची गरोदर अन् पतीचे निधन, धुणी भांडी केली आज अग्निशमन दलात आहे मोहिनी! Video ‘आम्ही मुलींच्या शिक्षणात कधीही आडकाठी केली नाही. त्यांना त्यांच्या करिअर निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे मुलींनी मन लावून अभ्यास आणि प्रॅक्टीस केली. त्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे. घरातील दोन्ही मुली आणि सुनबाईची पोलिसांमध्ये निवड झाल्यानं खूप आनंद झालाय, अशी भावना भगवान सोनटक्के यांनी व्यक्त केली.