नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 30 मे : संकट ही परीक्षा पाहण्यासाठी असतात. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपण या संकटांना परतवून लावू शकतो. जालन्याच्या आदित्य गोरे या तरूणानं हे सिद्ध करून दाखवलंय. आदित्यच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्यातच त्याच्या वडिलांना कॅन्सरचं निदान झालं होतं. या खडतर परिस्थितीतही तो खचला नाही. तो रिक्षा चालवून घरखर्च भागवतोय. त्याचबरोबर बारावीच्या परीक्षेत 60 टक्के मार्क्सही मिळवलेत. …सोडली नाही जिद्द! आदित्य हा जालना तालुक्यातील भिलपुरी या छोट्याशा गावाचा रहिवासी आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. घरी फक्त एक एकर शेतजमीन आहे. त्यामधून फारसे उत्पन्न निघत नाही. त्याच्या घरी आई वडील एक बहिण आणि आजी, आजोबा असा परिवार आहे. घराला हातभार लागावा म्हणून तो नववीपासून रिक्षा चालवतोय.
त्याच्या वडिलांना कॅन्सरचं निदान झाल्यानं त्याला मोठा धक्का बसला. पण, परिस्थितीचं गांभीर्य पाहून त्यानं स्वत:ला सावरलं. सध्या तो रामनगर ते जालना मार्गावर रिक्षा चालवून कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय. वडिलांवर पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची आई देखील वडिलांसोबत दवाखान्यात आहेत. तो आजी-आजोबांसोबत राहतो. 50 लाखांचे पॅकेज असलेल्या सॅाफ्टवेअर इंजिनिअरने दिली UPSC ची परीक्षा, अखेर निकाल आला Video ‘माझी घरची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे मी नववी पासून रिक्षा चालवतोय. आताच बारावीचा निकाल लागला. यात मला ६० टक्के मार्क मिळाले. यामुळे मी खूप खुश आहे. घरी कमवणारे कोणी नसल्याने मलाच रिक्षा चालवून पैसे जमावावे लागतात. हे काम करत असताना मी अभ्यास पण सुरू ठेवला. त्यामुळेच मी चांगल्या मार्कांनी पास झालो. मला पुढे शिकण्याची इच्छा आहे. पण परिस्थितीमुळे शिकता येईल की नाही, हे माहिती नाही,’ असं आदित्यनं सांगितलं. लहानवयापासून परिस्थितीशी लढत शिक्षण घेणाऱ्या आदित्यची स्वप्न मोठी आहेत. ही पूर्ण करण्यासाठी त्याला समाजातील दानशूर मंडळींकडून मदतीची गरज आहे. ही मदत मिळाली तरच आदित्य मोठी भरारी घेऊ शकेल.