नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 31 मे : शेतकरी शेतीमध्ये आता नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान तसेच सोशल मीडियाचा वापर करून शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग होत आहेत. असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील काजळा गावातील शेतकरी अशोक पांढरे यांनी केला आहे. त्यांनी पिकवलेल्या बाजरी पिकाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. तुर्कीवरून मागवलेल्या या बाजारीला तब्बल तीन ते चार फूट लांबीची कणसे लागली आहेत. जालना- अंबड महामार्गावर काजळा हे गाव आहे. काजळा हे एकेकाळी सतत पाणी टंचाईचा सामना करणारे गाव म्हणून ओळखले जात होते. अलीकडे या गावातील काही शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेती मार्ग स्वीकारु लागले आहेत. यासाठी नवीन बियाणांची लागवड करून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेत आहेत. अशोक मुकुंदराव पांढरे हे त्यापैकी एक शेतकरी आहेत. दहावी पर्यंत शिक्षण झाल्याने आधुनिक शेतीकडे कल असणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. गतवर्षी त्यांनी एका एकरात काकडीची लागवड केली. त्यातून भरघोस उत्पन्न झाले. शिवाय 30 गुंठ्यात कारले लावले त्यातून 2 लाख रुपये कमवले होते.
तीन ते चार फुट उंचीचे कणीस अशोक पांढरे यांनी तुर्की येथून तुर्की बाजरीचे बियाणे मागितले. पांढरे यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी तुर्कीच्या बाजरीची एक एकर क्षेत्रावर लागवड केली होती. खतं आणि ठिबक सिंचनावर साडेतीन महिन्यातच तुर्कीची बाजरी तोडणीस आली आहे. या तुर्की बाजरीचे कणीस हे तीन ते चार फुट उंचीचे आहे. पांढरे यांचे हे बाजरीचे पीक बघण्यासाठी अनेक शेतकरी गर्दी करीत आहेत. युट्यूबवर मिळाली माहिती शेतीत काहीतरी नवा प्रयोग करून पाहावा ज्यातून आर्थिक उन्नती तर होईलच शिवाय इतर शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल असं वाटत होतं. त्यामुळे शेतीमधील वेगवेगळे प्रयोग युट्यूबवर बघत होतो. त्यामध्ये तुर्की बाजरीच्या बियाण्याची माहिती मिळाली. या बियाण्याची उगवण क्षमता, कणीसाची मोठी लांबी,त्यामुळे मिळणारे जास्तीचे उत्पन्न यावर त्यांनी सखोल माहिती घेतली.
शेतीत काही मिळेना, मग सुरू केला हा जोड धंदा, आज बांधला 35 लाखांचा बंगला!
आपल्याकडील बाजरी पेक्षा तीन पट उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी तुर्की येथील संबंधित कंपनीशी संपर्क साधून 1 हजार 500 रूपये किलो दराने एक किलो तुर्की बाजरीचे बियाणे मागविले आणि त्याची लागवड देखील केली. भारतातील संकरित बाजरी लागवडीतून एकरी 12-14 क्विंटल उत्पन्न मिळते. तर गावरान बाजरी लागवडीतून एकरी 10 क्विंटल उत्पन्न मिळते. या बाजरीतून मला एका एकरात त्यांना 40 क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे.