नारायण काळे, प्रतिनिधी
जालना, 25 मे : मराठवाड्यातील शेतकरी अनेक संकटांना वेळोवेळी तोंड देत असतो. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळी तर कधी अवकाळी या सगळ्यातून सावरल्यास बाजारात दर मिळत नाही. त्यामुळे शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी वेगवगेळे व्यवसाय करत असतात. जालना जिल्ह्यातील खरपुडी गावातील कैलास शेजुळ हे देखील शेतीला जोड धंदा म्हणून शेळी पालन करतात. याचं शेळीपालन व्यवसायातून त्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.
... आणि व्यवसायला सुरुवात केली
कैलास शेजुळ हे जालना जिल्ह्यातील खरपुडी या गावचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे 5 एकर कोरडवाहू जमीन आहे. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतीमधून अपेक्षित उत्पन्न निघत नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या शेजुळ यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानुसार शेळी पालन व्यवसायास सुरुवात केली. 2016 मध्ये त्यांनी उस्मानाबादी या जातीच्या 10 शेळ्या आणि एक बोकड खरेदी केले. यानंतर त्यांनी हा व्यवसाय वाढवत नेला.
तब्बल 35 लाखांचे बांधले घर
सध्या त्यांच्याकडे 50 शेळ्या आहेत. 100 शेळ्या पर्यंत त्यांनी त्यांचा व्यवसाय नेला होता. बकऱ्याची विक्री ते 4 ते 5 हजार रुपये दराने करतात. मागील पाच ते सहा वर्षापासून दरवर्षी 5 ते 6 लाख रुपये कैलास शेजुळ बकऱ्याच्या विक्रीतून कमवतात. याबरोबरच त्यांनी नुकताच कुकुटपालन आणि रेशीम शेती हे नवीन व्यवसाय देखील सुरू केले आहेत. या सर्व व्यवसायातून त्यांनी तब्बल 35 लाखांचे घर गावात बांधले आहे.
गावकऱ्यांनी मनावर घेतलं आणि चमत्कार घडला, थेट राष्ट्रीय स्तरावर घेतली दखल!
कसे असते नियोजन?
कैलास शेजुळ सकाळी पाच वाजता उठतात आणि गोठ्यातील साफसफाई करतात. त्यानंतर सकाळी नऊ वाजत शेळ्यांना कोरडा चारा दिला जातो. त्यानंतर दुपारच्या सुमारास तासभर त्यांना मोकळ्या शेतात चरण्यासाठी सोडले जाते. यानंतर दुपारी हिरवा चारा दिला जातो. संध्याकाळी सहा वाजता शेळ्यांना पुन्हा कोरडा चारा दिला जातो. उस्मानाबादी जातीची शेळी काटक असल्याने रोगांना फारशी बळी पडत नाही. तरीदेखील वर्षातून एकदा त्यांचे लसीकरण केले जाते, असं कैलास शेजुळ सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jalna, Local18, Success Story