जालना, 28 जुलै : देशातील घराघरात वीज पोहचली असल्याचे आपल्याला सांगितले जाते. पण वास्तव काही वेगळेच आहे. महाराष्ट्र सारख्या प्रगतशील राज्यातील एखाद्या गावात आजपर्यंत वीज पोहचली नाही यावर विश्वास ठेवणे जरा कठीण जाईल पण हे खरं आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगांव जहागिर येथील आंबेडकरवाडी ही वस्ती मागील 40 वर्षांपासून रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या सुविधा मिळाव्यात यासाठी आता येथील ग्रामस्थांनी निर्धार केला असून आठ दिवसात निर्णय झालं नाही तर गावच सोडून जाण्याचा इशारा दिला आहे. सुविधांचा अभाव भोकरदन तालुक्यातील बोरगांव जहागिर येथील आंबेडकरवाडी येथील लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी गुडघ्या इतक्या चिखलातून मार्ग काढून दररोज शाळेत जाव लागतय. बोरगाव जहांगिर-मौजे आंबेडकरवाडी येथे जवळपास 40 वर्षांपासून नागरिक वास्तव्यास राहत आहेत. वस्ती ही मुख्य रस्त्यापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. ऐन पावसाळ्याच्या काळात जास्त पाणी झाल्याने गावाचा आणि वस्तीचा संपर्क तुटतो.
वस्तीवरील 40 मुलांना शिक्षणासाठी बाहेरगांवी जावे लागत असल्याने तीन किलोमीटरपर्यंत पायी प्रवास चिखलातून करावा लागतोय. यासोबतच वीज आणि पाण्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी नाही. येत्या आठ दिवसात जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्यास वस्ती सोडून जिल्हाधिकारी कार्यालय ते मुंबई येथे मुख्यमंत्र्यांना भेटण्यास संपुर्ण कुटुंबासह जाणार असल्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे. एकानेही आमची दखल घेतली नाही बोरगाव जहागीर येथील आंबेडकरवाडी इथे मी माझ्या आजोबा पणजोबा यांच्या काळापासून राहतो. मात्र इथे अजूनही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, जाण्या येण्यासाठी रस्ता नाही, तसेच विजेची देखील सोय नाही. वस्तीवरील जवळपास 40 मुलं वेगवेगळ्या शाळेत जातात. त्यांना गुडघाभर चिखलातून जावं लागतं. राजकारणी लोक येवून फक्त आश्वासन देऊन जातात. आतापर्यंत एकानेही आमची दखल घेतली नसल्याची खंत रहिवाशी गणेश दांडगे यांनी व्यक्त केलीय.
सडलेला वास अन् जिकडे तिकडे चिखल! तुमच्या ताटात येणारी भाजी इथून येते का? Video
बऱ्याच वर्षांपासून आम्ही रस्ता, पाणी आणि वीज यांसाठी संघर्ष करत आहोत. शाळेतील विद्यार्थी चिखल तुडवत शाळेत जातात. काहीच दिवसांपूर्वी माझ्या आजोबांना हृदय विकाराच्या झटका आला तर त्यांना गडीबैलात किंवा खांद्यावर उचलून न्यावे लागते. इथे बऱ्याच अडचणी आहेत. गर्भवती महिलांना जर वेळेत दवाखान्यात पोहचवत आले नाही तर अनर्थ घडू शकतो. त्यामुळे शासनाने आठ दिवसांत आमच्या समस्यांवर मार्ग काढावा अन्यथा आम्ही गाव सोडून आमचा लढा लढणार असल्याचे ग्रामस्थ राहुल दांडगे यांनी सांगितले.