नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 2 जून : शेतातील पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून शेतकरी आता मोसमी पावसाची प्रतीक्षा करत आहे. उन्हाळा संपून आता मोसमी पावसाची चाहूल शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे मशागतीची कामे उरकून बियाणे आणि खत खरेदी साठी शेतकरी लगबग करत आहेत. मात्र ही खरेदी करताना अनेकदा फसवणूक होते. ही फसवणूक टाळण्यासाठी जालना कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे. फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी? खरीप हंगामात जालना जिल्ह्यात 6 लाख 18 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन जिल्हा कृषी विभागाने केलं आहे. शेतकऱ्यांनी बियाणे आणि खत खरेदी करताना सावधानता बाळगावी. बियाणे आणि खत खरेदी करताना आधारकार्ड देऊनच खरेदी करावी आणि खरीदीचे बिल जपून ठेवावे. तसेच अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावी, असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील 23 कृषी सेवा केंद्रावार केली कारवाई शेतकऱ्यांना दिली जाणाऱ्या कृषी निविष्ठा दर्जेदार नसल्याने जिल्ह्यातील 23 कृषी सेवा केंद्र यांच्यावर कृषी विभागाने कारवाई केली आहे. यापैकी पाच कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तर एका कृषी केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून तब्बल 17 केंद्रांना विक्री बंदचा आदेश देण्यात आल्याचेही कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांनी सागितले.
9 भरारी पथकांचा वाच जिल्ह्यात बोगस खते आणि बियाणे तसेच कीटक नाशके यांची विक्री होत असल्यास तपासणी साठी नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक असे आठ आणि जिल्हा स्तरावर एका अशी एकूण नऊ भरारी पथके कृषी सेवा केंद्र यांच्या कामावर नजर ठेवणार आहेत. शेतकऱ्यांना उत्कृष्ठ दर्जाच्या कृषी निविष्ठा द्याव्यात. कोणत्याही विशिष्ठ कंपनीचे उत्पादन घेण्याचा आग्रह करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असंही कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.