नारायण काळे, प्रतिनिधी
जालना 3 मार्च : मुलीचा जन्म झाला की आजही नाकं मुरडली जातात. मुलगा होत नाही म्हणून होणारा सुनेचा छळ किंवा मुलीला तुच्छ वागणूक मिळणे यासारख्या या घटना देखील समाजात नवीन नाहीत. यावर उपाय म्हणून जालना जिल्ह्यातील जाफराबाद मधील टेंभुर्णी ग्रामपंचायतीनं एक नवा उपक्रम सुरू केला आहे. वाढती स्री-पुरुष असमानता, लिंग गुणोत्तरातील तफावत आणि स्री जन्माविषयी आजही समाजात रूढ असलेली मानसिकता बदलावी यासाठी जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतने हा लेकींचा सन्मान करणारा हा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती पासून गावात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे एफडी तर नववधूला माहेरचा आहेर देण्यात येणार आहे. हा उपक्रम गावात सुरू झाल्यापासून आतापर्यंत 9 नव वधुंना माहेरचा आहेर म्हूणन पैठणी साडी भेट म्हणून देण्यात आली आहे. तर जन्माला आलेल्या एका मुलीच्या नावे 2100 रुपये एफडी करण्यात आला आहे.
का घेतला निर्णय?
लोकांचा मुलींविषयी असलेल्या दृष्टिकोनात बदल व्हावा म्हणून आम्ही 19 फेब्रुवारी 2023 रोजीपासून अमृत महोत्सवी वर्ष व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे 2100 रुपये एफडी तर गावाप्रती असलेली आपुलकी कायम राहावी यासाठी नववधूला लग्नात पैठणी देण्याचा निर्णय घेतला आहे, असं टेंभुर्णी गावच्या सरपंच सुमनबाई म्हस्के यांनी सांगितले.
ग्रामपंचायतचे आभार
माझ्या मुलीचा लग्न सोहळा 27 फेब्रुवारी रोजी झाला. यावेळी ग्रामपंचायतकडून माझ्या मुलीला पैठणी भेट म्हणून देण्यात आली. मुलीचा गावाशी लळा कायम राहावा म्हणून ही भेट देण्यात आली. गावाने दिलेली ही भेट माझ्या मुलीच्या कायम स्मरणात राहील. याबाबत मी ग्रामपंचायतचे मनापासून आभार मानते, असं नववधूची आई शारदा देशमुख यांनी सांगितले.
Success Story : नोकरी सोडून गावातच सुरु केला कॅफे, आता होतीय लाखोंची कमाई, Video
भेट दिल्याबद्दल मी ऋणी
'सरकारनं मुलींसाठी काही ना काही करायलाच पाहिजे. माझ्या मुलीला 2100 रुपयांची भेट दिल्याबद्दल मी ऋणी आहे', अशी भावना अनिता आमले यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.