नारायण काळे, प्रतिनिधी जालना 02 मार्च : सध्या तरुणाईमध्ये फास्टफूडचे प्रचंड क्रेझ आहे. पिझ्झा, बर्गर, सँडविच हे पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात. यामुळे नोकरी सोडून जालन्यातील वाटुरच्या तरुणाने स्वतःच्या गावामध्ये या पदार्थांची विक्री करायला सुरुवात केली आहे. त्याने सुरु केलेला टेस्टी कॉर्नर हा कॅफे चांगलाच लोकप्रिय झाला असून कॉलेजच्या तरुण तरुणींचा आवडीचा कट्टा बनला आहे. कधी झाली सुरुवात? सुदर्शन गंडे हे या उद्योजक तरुणाचं नावं असून औरंगाबादमध्ये त्याने फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने हैद्राबाद येथील एका चॉकलेट कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र, नाममात्र पगार मिळत असल्यामुळे नोकरी सोडून तो गावी परतला अन् गावातच 2021 साली टेस्टी कॉर्नर हा कॅफे सुरू केला. सुदर्शनमुळे वाटूर सारख्या गावात पिझ्झा, बर्गर, सँडविच सारखे पदार्थ लोकप्रिय झाले आहेत.
कमी वयात कुटूंबाची जबाबदारी सुदर्शन गंडे याच्या वडिलांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. तेव्हा त्याचे वय 8 वर्षे होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबारी दोघा भावंडावर आली. शाळेत हुशार असणाऱ्या सुदर्शनला कोवळ्या वयात लस्सीच्या दुकानावर 12 ते 13 तास काम करावे लागले. सुदर्शनला कॅफे सुरु केल्यानंतर सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. आता मात्र हा कॅफे चांगलाच लोकप्रिय झाला आहे. कोणते पदार्थ मिळतात? टेस्टी कॉर्नर वर ग्राहकांना कोल्ड कॉफी, पिझ्झा, बर्गर, सँडविच, वडापाव पदार्थ मिळतात. पिझ्झा 100 ते 250 रुपये, बर्गर 50 रुपये, वडपाव 10 रुपये, कोल्ड कॉफी 50 रुपयांना मिळते.
Jalna News : लोणी स्पंज डोसा खाण्यासाठी ‘इथं’ होते गर्दी, विक्रेता झाला लखपती! Video
अनेक अडचणी आल्या
माझी परिस्थिती सुरुवातीपासूनच हलाखीची होती. वडील मी दुसरीत असताना वारले. त्यानंतर माझ्यावर आणि माझ्या मोठ्या भावावर कुटुंबाची जबाबदारी आली. आम्ही कधीच कामाची लाज बाळगली नाही. पदवी शिक्षण घेत असताना देखील मी भाजीपाला विकायचो. फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण झाल्यानंतर मी हैदाराबाद इथे नोकरी केली. पण अपेक्षित पगार मिळत नव्हता. आई देखील घरी एकटीच होती म्हणून घरी परतलो आणि हा नवीन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या पण आता व्यवसाय सुरुळीत सुरू आहे. दररोज 2 ते अडीच हजार रुपये कमाई होते, असं सुदर्शन गंडे याने सांगितले. इथले पदार्थ आवडतात मी इथे नेहमी येतो. आमच्या कुटूंबातील सगळ्यांना इथले पदार्थ आवडतात. मी विशेषत: पिझ्झा आणि बर्गर घेण्यासाठी इथे येतो, असं ग्राहक ओम भोंगणे यांनी सांगितले.