नारायण काळे, प्रतिनिधी
जालना, 3 एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झालेत. या परीक्षेत अनेक तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घवघवीत यश मिळवलंय. जालना जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्याच्या मुलानं या परीक्षेत वन परिक्षेत्र अधिकारी या पदाला गवसणी घातलीय. भागडे सावरगाव या अतिशय छोट्या आणि दुर्गम भागातील गोविंद घोडके यांनी ही कामगिरी केलीय.
गोविंद यांनी या परीक्षेत 236 वा क्रमांक पटकावलाय. त्यामुळे त्यांची रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावर निवड झालीय. त्याच्या निवडीनं गावकरी आणि कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गावकऱ्यांनी चक्क गावातून त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.
कसा झाला प्रवास ?
'माझा मुलगा अधिकारी झाला, यावर विश्वासच बसत नाही. मी अजूनही स्वप्नातच आहे असं वाटतं,' हे सांगताना गोविंद यांच्या वडिलांना अश्रू आवरले नाहीत. गोविंद लहान होता तेव्हा आमची परिस्थिती खूप हालाखीची होती. मी त्याला शेतात नेत असे. औताच्या जुआला झोळणी करून त्याला झोपवत असे. तो उठल्यावर मीठ, हायब्रीड ज्वारीची भाकरी आणि आंब्याचं लोणचं चोळून खाऊ घालत असे. अंगावर घालण्यासाठी धड कपडे देखील नव्हते. ती परिस्थिती खूप बिकट होती. आता देवाच्या आशिर्वादानं सर्व चांगलं झालंय. आज जे काही आहेत, ती भगवंताची देण आहे,' अशी भावनिक प्रतिक्रिया गोविंद यांचे वडील प्रभाकर घोडके यांनी दिली.
डॉक्टर कन्येची भरारी, महाराष्ट्रात अव्वल येत झाली वनअधिकारी, पाहा Video
'आम्ही गोविंदच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. त्याचे पांग मुलानं फेडले याचा आनंद होतोय. आता बरं वाटतंय. कितीही काम करावं लागलं तर मागे हटू नको. आम्ही तुला काही कमी पडू देणार नाही, असं त्याला सांगत असू. त्यानं देखील जिद्दीनं अभ्यास करून त्याचं स्वप्न पूर्ण केलं. आमचा मुलगा अधिकारी होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं गोविंदच्या आई महानंदा घोडके यांनी सांगितलं.
'गोविंदच्या आजोबाचं तीन महिन्यापूर्वीच निधन झालं. ते आज असते तर आनंदानं नाचले असते. माझा नातू लाल दिव्याची गाडी घेऊन येईल, असं ते नेहमी म्हणत,' असं सांगताना गोविंदच्या आजीचे डोळे पाणावले होते.
शेतकऱ्याची लेक आली राज्यात दुसरी! यशाची प्रेरणा सांगताना म्हणाली...Video
'माझा संघर्ष खूप मोठा आहे. तो सर्व सांगता येणार नाही. मा आज जे काही आहे, त्यावर समाधानी आहे. सेवेत रूजू झाल्यानंतर माझ्यासारखी पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या अडचणी सोडवण्यावर भर देणार आहे. गावाच्या समस्या सोडवण्य़ासाठी काही उपक्रम डोक्यात आहेत. ते राबविण्याचाही प्रयत्न असेल, असं गोविंद यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Jalna, Local18, MPSC Examination