जालना, 24 नोव्हेंबर : 'राज्यात 2 महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळून भाजप सत्तेवर येणार आहे,' या रावसाहेब दानवे यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी खोचक टीका केली आहे. 'ज्या भाजपला राज्यात भल्या पहाटे स्थापन केलेलं सरकार दोन दिवस टिकवता आलं नाही, ते काय दोन महिन्यानंतर सरकार स्थापन करतील,' असा टोला शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी लगावला आहे.
'भाजपच फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यांना त्यांचे आमदार टिकून ठेवायचे आहेत. त्यासाठी भाजपचे नेते उलट सुलट वक्तव्य करत आहेत,' असा आरोपही शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला आहे. ते जालन्यात बोलत होते.
रावसाहेब दानवे यांनी काल दोन महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार असून भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा केला होता. त्याला उत्तर देत विखे हे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गळाला लागले असून भाजप 2 महिन्यात फुटल्याशिवाय राहणार नाही असा दावा देखील खोतकर यांनी केला आहे.
दरम्यान, दानवेंना 2 महिने नाही 200 वर्ष भाजपचं सरकार येणार नाही असं म्हणायचं आहे, तुम्ही 2 महिने ऐकलं. त्यांनी 2 महिन्यांसाठी चकवा दिला आहे, असं सांगत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दानवे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. पुढचे 20 वर्ष राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार राहील. तरीही भाजपचे प्रयोग सुरूच राहतील, असं सांगत भाजपने त्यांचे 105 आमदार सांभाळून ठेवावे. त्यांच्यावर मला शंका आहे, असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raosaheb Danve, Shivsena