जळगाव, 28 जानेवारी : राजकीय क्षेत्रातील सातत्याच्या व्यस्ततेमुळे अनेकदा नेत्यांना आपले इतर छंद पूर्ण करता येत नाहीत. मात्र संधी मिळताच नेत्यांमधील सुप्त गुण बाहेर येतात आणि सर्वांना आश्चर्यचकित करून जातात. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबतही असंच काहीसं घडलं आहे.
प्रजासत्ताक दिनी मंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद येथे एका खासगी वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमाप्रसंगी हिंदी चित्रपटातील ''तेरी मेहरबानीया" हे गीत सादर केले. अगदी तालासुरात त्यांनी हे गीत सादर केल्याने उपस्थितही भारावून गेले आणि त्यांनी पाटील यांच्या गायनाला भरभरून दादही दिली.
यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मी तारुण्यात नाटकातही अभिनय केला आहे. पोवाडे सादर करणे, गाणे म्हणणे मला आवडते. मी अनेक स्टेज गाजवले आहे, असंही ते म्हणाले.
गुलाबराव पाटील यांच्या गायनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आणखी एक मंत्री संजय राठोड यांचाही एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला होता. राठोड यांनी आपल्या पत्नीसह एका कार्यक्रमात कपल डान्स केला होता. त्या व्हिडिओनेही सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.