नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 16 जुलै : जिल्ह्यातील नशिराबाद येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतातील झोपडीच्या अंगणात खेळत असताना विद्युत खांबाला धक्का लागल्याने तीन वर्षाची चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारात रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने सोबत असलेल्या मोठ्या बहिणी यात बचावल्या आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बावली रूमला पावरा (वय 3) रा. नशिराबाद ता. जि. जळगाव असे मृत बालिकेचे नाव आहे. कशी घडली घटना? नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, नशिराबाद गावातील चंदन सोपान पाटील यांच्या शेतात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ईश्वर पावरा हा तरूण आई, वडील, पत्नी आणि तीन मुलीसोबत झोपडी करून वास्तव्याला आहे. त्यांच्या घराच्या बाजूतून विद्युत तारा गेलेल्या असून झोपडीच्या नजीक ईश्वर पावरा आणि त्याचे आईवडील यांची असे एकुण दोन झोपड्या आहेत. ईश्वर पावरा हा कामाच्या निमित्ताने बाहेरगाव गेलेला होता. रविवारी 16 जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ईश्वरची सर्वांत लहान मुलगी बावली ही आपल्या दोन मोठ्या बहिणीसोबत झोपडीजवळ खेळत होत्या. त्यावेळी लोखंडी खांबात विजेचा प्रवाह उतरलेला होता. त्यावेळी बावली ही खेळत असताना तिचा विजेच्या खाबाला धक्का लागला. त्यावेळी तिला विजेचा धक्का लागल्याने जागीच दुदैवी मृत्यू झाला. तिच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाचा - धक्कादायक! अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करून धर्मांतरणाचा प्रयत्न गृहिणीच्या घरात शिरून विनयभंग शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कानळदा रोडवर कुटुंबीयांसह वास्तव्यास असलेल्या 35 वर्षीय गृहिणीच्या घरात शिरून तिच्याशी अंगलट करून विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कल्पेश अशोक अमृतकर (वय 30, रा. केसीई पार्क) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. विशेष म्हणजे, पीडितेच्या घरात शिरताच त्याची पत्नीच तेथे आल्याने भामट्याचे प्रताप उघड झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.