जळगाव, 12 डिसेंबर : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथील निवासस्थानी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं. 'मुंडे साहेब असते तर आज महाराष्ट्राच्या राजकारणाची वेगळी स्थिती असती. दुर्दैवाने मुंडे साहेब आज आपल्यासोबत नाहीत, मात्र त्यांचे विचार सोबत आहेत. त्यांच्या विचारांच्या सोबत राहून आपण काम करावं,' असं उद्गार यावेळी एकनाथ खडसे यांनी काढले.
'गेल्या सहा वर्षांच्या काळात एकही दिवस असा गेला नाही की मुंडे साहेबांची आठवण झाली नाही. मुंडे साहेब हयात असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गोरगरीब दीन दलित आदिवासी वंजारी या समाजासाठी काम करत राहिले. महाराष्ट्राच्या एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या मुंडे साहेबांनी उपमुख्यमंत्रिपदापर्यंत झेप घेतली. कार्यकर्त्यांवर त्यांचे अधिक प्रेम होते, त्यामुळे कार्यकर्त्यांना ते प्राधान्य द्यायचे. गोर गरीब माणसाचा नेता म्हणून मुंडे साहेबांकडे पाहायला जायचं. मुंडे साहेब अचानक निघून गेल्यामुळे आपल्या सर्वांची हानी झाली असून त्यामुळे आजही मुंडे साहेबांची कमी जाणवते,' असंही एकनाथ खडसे म्हणाले.
'एका व्यक्तीमुळे बराच फरक जाणवतो...'
'मुंडे साहेब असेपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा होती. त्यांच्या प्रभुत्वामुळे अनेकांना त्यांनी घडवलं. आज मुंडे साहेब असते तर राज्याच्या राजकारणाची स्थिती वेगळी असती. एका व्यक्तीमुळे बराचसा प्रभाव जाणवतो. दुर्दैवाने मुंडे साहेब आज ,मात्र त्यांचे विचार आपल्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांसोबत राहून आपण काम करावं,' असं आवाहन एकनाथ खडसे यांनी आपल्या समर्थकांना केलं आहे.