Home /News /maharashtra /

एकनाथ खडसे शरद पवारांना वाढदिवसाला देणार अनोखं गिफ्ट, मोर्चेबांधणी सुरू

एकनाथ खडसे शरद पवारांना वाढदिवसाला देणार अनोखं गिफ्ट, मोर्चेबांधणी सुरू

शरद पवारांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न एकनाथ खडसे यांच्याकडून सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

जळगाव, 2 डिसेंबर : भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे आता राजकीय मैदानात चांगलेच सक्रीय झाले आहेत. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी मजबूत करणार, असा शब्द पक्षप्रवेशावेळी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला होता. तोच शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न एकनाथ खडसे यांच्याकडून सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून एकनाथ खडसे यांची नगर परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या मोर्चे बांधणीसाठी बैठक होत आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक आज आयोजित केली असून खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीला एकनाथ खडसे यांच्यासह जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्रभैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबाराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, दिलीप वाघ, गफ्फार मलिक, उपस्थित आहेत. जिल्ह्यात पक्ष बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने ही बैठक अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. भाजपला आव्हान दिलेल्या खडसेंना जिल्ह्यात यश मिळणार? भाजपमध्ये आपल्यावर वारंवार अन्याय झाल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. खरंतर एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच सुरू होती. मात्र खडसे यांनी वेट अँड वॉच म्हणत निर्णय घेण्याचं टाळलं. मात्र अनेक महिने लोटल्यानंतरही पक्ष नेतृत्वाने खडसे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न सोपवल्याने त्यांनी भाजपला रामराम केला. राष्ट्रवादीत प्रवेश करताना ज्या पद्धतीने मी भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न केले, तेवढेच किंबहुना त्याहूनही अधिक प्रयत्न करून मी उत्तर महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करेन, असा शब्द खडसे यांनी शरद पवारांना दिला होता. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांमध्ये एकनाथ खडसे आपल्या कामगिरीची चमक दाखवणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Eknath khadse, Sharad pawar

पुढील बातम्या