जालना, 11 ऑगस्ट : एखाद्या सिनेमाला लाजवले असा छापा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालन्यामध्ये टाकला. छापा टाकण्यासाठी येत असल्याची खबर कुणाला लागू नये म्हणून आयकर विभागाचे अधिकारी चक्क वऱ्हाडी बनून आले होते. दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकर असलेल्या लग्नाच्या गाड्यांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी जालन्यात पोहोचले आणि आठ दिवस छापे मारून 390 कोटी बेनामी संपत्तीचा पर्दाफाश केला.
स्टिल उत्पादनामध्ये जालना हा महाराष्ट्रात नावाजलेला आहे. पण, आयकर विभागाने स्टिल कारखानदारांचा बेकादेशीर उद्योग चव्हाट्यावर आणला आहे. आयकर विभागाने स्टिल उत्पादन करणाऱ्या कारखानदारांच्या घर, फार्महाऊस आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छाप टाकला. या छाप्यामध्ये आयकर विभागाच्या हातात मोठे घबाड लागले आहे. तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर आली आहे. यात 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरेसह 16 कोटींचा ऐवज सापडला आहे. एवढंच नाहीतर 300 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रही सापडली आहे.
(लाखोंमध्ये पगार आणि टॉप कंपन्यांमध्ये जॉब हवाय ना? मग हे IT सर्टिफिकेशन्स कराच)
मागील 1 ऑगस्टपासून हे धाड सत्र सुरू होते. तब्बल 8 दिवस ही कारवाई चालली. आयकर विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या पथकांमार्फत एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. आयकर विभागाने नवीन एमआयडीसी मधील 3 रोलिंग मिल आणि त्यांच्याशी निगडित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. या कारवाईमध्ये तब्बल 390 कोटींची रोकड हाती लागली. ही रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल 16 तास लागले.
(लाथा-बुक्याने महिलांना बेदम मारहाण, बारामतीतला VIDEO, अजूनही एकाला अटक नाही!)
जालन्यातील या चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवहारातून मिळवले आणि हे व्यवहार रोखीत केले, याची माहिती रेकॉर्डवर आणली नाही. त्यामुळे आयकर विभागाने अत्यंत गुप्तपद्धतीने हा छापा टाकला.
सुरुवातीला घरात काहीच सापडले नाही!
या कारखानदारांच्या घरावर, कार्यालय, फार्महाऊस छापे टाकण्यात आले होते. एकाच वेळी पाच पथकांनी कारवाई केली. सुरुवातीला पथकाच्या हाती काही लागले नाही. पण नंतर जेव्हा पथकाने शहरापासून दूर असलेल्या फॉर्महाऊसवर धाड टाकली तेव्हा घबाड हाती लागले. कपाटाखाली, बिछान्यामध्ये पैशांची बंडलं सापडली. यामध्ये तीन कारखानदारांकडे रोख रक्कम सापडली. त्याचबरोबर सोन्याचे दागिने सोन्याचे बिस्किटे, विटा, नाणी आणि हिरे मिळाले. एकूण ३२ किलो सोनं हातात लागले. एकूण सुमारे ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. तर औरंगाबादेतही दोन व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आले. त्यांच्याकडून ५८ कोटी रोख जप्त केली आहे. यात १६ काटींचे सोन्याचे दागिने, हिरे आढळले आहे. या कारवाईमध्ये 25 कापडी पिशव्यांमध्ये नोटांची बंडले पॅक केली होती. त्यानंतर ही रक्कम स्थानिक स्टेट बँकेमध्ये नेऊन मोजण्यात आली होती. सकाळी ११ च्या सुमारास मोजणी सुरू केली आणि ती रात्री १ वाजता संपली होती. पैसे मोजण्यासाठी 10 ते 12 मशीन लागल्या होत्या.
वऱ्हाडी बनून आले अधिकारी!
विशेष म्हणजे, जालन्यात येण्याआधी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नामी शक्कल लढवली. आपल्या कारवाईची कुणकुण कुणाला लागू नये म्हणून वऱ्हाडी बनून आले. कुणालाच याची खबर लागू नये म्हणून लग्नाच्या गाड्यातून हे अधिकारी शहरात पोहोचले होते. विशेष म्हणजे, आपण खरेच लग्नाला आलो आहोत, हे दाखवण्यासाठी गाड्यांवर दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकरही लावण्यात आले होते. नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईच्या अधिकाऱ्यांनी आपल्या गाड्यांवर सुद्धा असे स्टिकर लावले होते. एका गाडीवर तर वर आणि वधूचे स्टिकर लावलेले होते. प्रत्येक अधिकाऱ्यांच्या गटाला विशेष असा कोडवर्डही दिला होता. एकूण 260 अधिकारी आणि 120 गाड्यांचा हा ताफा होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.