वाशीम, 16 मार्च : लहाणपण देगा देवा..असं म्हटलं जातं, ते खरंच आहे..हे या एका प्रसंगावरुन तुमच्या लक्षात येईल. लहानमुलांचं भावविश्व लहान असलं तरी ते खरं आणि प्रामाणिक असतं. त्यात दुजाभाव नसतो. अशीच एक मनाला स्पर्शून जाणारी घटना वाशीम शहरात घडली आहे. येथील बाकलिवाल कॉलनीतील मुलांनी रस्त्यावरील भटक्या श्वानांची पिल्लं वाचवण्यासाठी कॉलनीमधून जाणाऱ्या वेगवान मोठ्या वाहनाच्या विरोधात 15 मार्च पासून बेमुदत रस्ता रोको आंदोलन पुकारलं आहे. (In Washim children blocked the road for puppies life) वाशीम ते झाकलवाडी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. परिणामी येथील वाहतूक वळविण्यात आली असून वाहनं बाकलिवाल कॉलनीतून जाणाऱ्या नव्याने केलेल्या रस्त्यावरून जात आहेत. या रस्त्यावरुन वाळूचे मोठे टिप्पर, विटा तसेच सिमेंटचे मोठे ट्रक, बुलडोजर, खाजगी मोठ्या बस, कार, जीप, ऑटो, दुचाकी आदी मोठी वाहनं वाशीम शहरातून झाकलवाडी, ड्रीम लँड सिटी तसेच इतर नव्याने होऊ घातलेल्या कॉलनीमधून भरधाव वेगाने जात असतात. कॉलनीत वास्तव्यास असलेल्या एका भटक्या श्वानाने पिल्लाना जन्म दिल्यानंतर येथील लहानग्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. या पिल्लांचा लळा कॉलनीतील मुलांना लागला आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने शाळा बंद असल्याने मुलं श्वानांच्या पिल्लांसोबत मनसोक्त खेळतात. काही दिवसांपासून कॉलनीतून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना मुलं विनंती करत असत ‘काका, गाडी हळू चालवा रस्त्यात श्वानाची पिल्लं येतात. ‘पण वाहन चालकांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. दोन दिवसापूर्वी एका चार चाकी गाडी खाली येऊन श्वानाचे एक पिल्लू मेलं. अतिशय जड अंतःकरणाने मुलांनी पिल्लावर अंत्यसंस्कार केले. तर आज एक पिल्लू एका वाहना खाली येऊन दोन्ही पायांनी अपंग झाल्यानं मुलांच्या संयमाचा बांध सुटला आणि या 5 ते 15 वयोगटातील 10 -12 मुलांनी कॉलनीमधून जाणारा रस्ता बंद करण्याचा निश्चय केला. हे ही वाचा- 30 कुत्र्यांवर बलात्कार करणाऱ्या 68 वर्षाच्या वयोवृद्धाला अटक, मुंबईतील घृणास्पद जवळपास जेवढे लहान - मोठे दगड होते ते रस्त्यावर आणून लावले आणि रस्ता बंद करून स्वतः मानवी साखळी बनत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाचे दळण वळण बंद केले. हा रस्ता रोको बेमुदत राहील अशी घोषणा ही त्यांनी केली आहे. हे कार्य कॉलनीमधील यशोमित्र दापूरकर या बालकाच्या नेतृत्वात मानव डहाळे, अभिषेक भिसे, योगेश टेकाळे, अथर्व अंभोरे, संदेश शिंदे, अक्षरा डहाळे, नीलिमा टेकाळे, अर्णव अंभोरे, मुकुल टेकाळे, मनाली डहाळे, शुभम इढोळे, मानस दाभाडे, तन्मय अग्रवाल, तन्मय हजारे यांनी केले. येथून जाणाऱ्या जड वाहनाने अनेक वेळा कॉलनीमधील विद्युत तारा तुटल्या आहेत. तर तेथे वावरणारी लहान मुलं वाहनाखाली येता येता राहिले आहेत. लहान मुलांचा आक्रमक अवतार पाहून अनेक वाहनचालक त्या मार्गाने येत नसल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.