गोव्यात 11 वीच्या पुस्तकात शिवाजी आणि संभाजी महाराजांचं बदनामी करणारं लिखाण

गोव्यात 11 वीच्या पुस्तकात शिवाजी आणि संभाजी महाराजांचं बदनामी करणारं लिखाण

गोवा शासनाच्या इयत्ता 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकात एक पुरवणी 'गोव्याचा इतिहास' नावाने जोडण्यात आली आहे.

  • Share this:

पणजी, 20 फेब्रुवारी : एकीकडे देशभरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात सुरु असताना दुसरीकडे मात्र गोव्यात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची बदनामी करणारं लिखाण केल्याचं उघड झालं आहे.

गोव्याच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्यावर अवमान करणारे लिखाण असल्याचं समोर आल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. गोवा शासनाच्या इयत्ता 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकात एक पुरवणी 'गोव्याचा इतिहास' नावाने जोडण्यात आली आहे. त्यात गोव्यातील बार्देश तालुक्यात छत्रपती शिवरायांनी आक्रमण करुन सलग तीन दिवस गावे लुटली, जाळपोळ केली, लहान मुले आणि महिलांना डांबून ठेवले तसंच काहींना ठार मारले असं छापण्यात आलं आहे.

परस्त्रीला मातेसमान वागणूक देणाऱ्या राजांनी शत्रूच्या स्त्रियांनाही सन्मानपूर्वक परत पाठवलं होतं. त्यामुळे शिवरायांच्या चरित्रावर चिखलफेक करणे हा मोठा अपराध आहे. त्यामुळे संबंधित लेखक आणि पाठ्यपुस्तकात हा धडा समावेश करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.

याबाबत हिंदू जनजागृती समितीकडून गोवा राज्य शिक्षण संचालक वंदना राव यांना निवेदन देण्यात आलं आहे. महाराजांबद्दल संतापजनक लिखाण करण्यात आलं असून राजांविषयी खोटा इतिहास कोणीही सहन करणार नाही. हे पुस्तक राज्य शासनाने त्वरीत मागे घ्यावं अन्यथा शिवप्रेमी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी दिला आहे.

'किल्ले रायगडाच्या रस्त्यावरची वृक्षतोड थांबणार का?' हिरवळ संस्थेचा सवाल

दरम्यान, शिवजयंतीच्या दिवशी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला हिरवळ प्रतिष्ठानने एक अनोखं आंदोलन केलं. या संस्थेचे कार्यकर्ते आणि रायगड रोडवरच्या गावांतल्या शाळांमधल्या मुलांनी राजमाता जिजाऊंच्या समाधीजवळ झाडं वाचवण्याची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जारी केलेल्या आज्ञापत्रात झाडांची जपणूक करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. हे आज्ञापत्र जिजाऊंच्या समाधीजवळ लावण्यात आलंय. हिरवळ संस्थेचे किशोर धारिया, त्यांचे कार्यकर्ते आणि या मुलांनी आज्ञापत्राचं वाचन केलं. त्याचवेळी शिवजयंतीच्या निमित्ताने पाचाडहून आलेली शिवाजी महाराजांची पालखीही आली. 'जय भवानी, जय शिवाजी' असा गजर करत या मुलांनी शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि हा जथ्था पुढे निघाला.

रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोड

किल्ले रायगडाला पूर्वीसारखं वैभव प्राप्त करून देण्यासाठी रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली. त्याचाच एक भाग म्हणून किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणासाठी ही वृक्षतोड होतेय.

मुंबई-गोवा हायवेपासून किल्ले रायगडाचा रस्ता सुमारे 23 किलोमीटरचा आहे. याच रस्त्यावर नातेखिंडीच्या जवळ झाडांची कत्तल करण्यात आलीय. हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया रायगड रस्त्यावरची ही झाडं वाचवण्याचा प्रयत्न करतायत.

शिवजयंतीच्या दिवशी सगळी शाळकरी मुलं, गावकरी, 'हिरवळ' चे कार्यकर्ते या सगळ्यांनी रायगड रस्त्यावरच्या झाडांना शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र लावलं आणि झाडांच्या रक्षणासाठी भगवं बंधनही बांधलं. रायगड रस्त्याच्या सुरुवातीच्या भागात वृक्षतोडीला सुरुवात झालीय पण गावकरी आणि मुलांच्या मागणीचा विचार करून पुढची झाडं तोडणं तरी थांबवावं, अशी हिरवळ संस्थेची मागणी आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही पण झाडांची अनावश्यक कत्तल थांबवा, असं किशोर धारिया म्हणतात.

371 झाडं तोडण्याची परवानगी

रायगड रस्त्याच्या रुंदीकरणाचा हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. वनखात्याने पहिल्या टप्प्यात 371 झाडं तोडण्याची परवानगी दिलीय पण रायगडच्या पूर्ण रस्त्याचं रुंदीकरण करायचं झालं तर सुमारे 4 हजार झाडं तोडली जातील, अशी भीती किशोर धारिया यांना वाटतेय. याबद्दल त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन दिलं आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी पत्र लिहून ही वृक्षतोड थांबवण्याची विनंती केली आहे.

रायगड रस्त्यावरच्या काचले, नाते, पाचाड अशा गावांतल्या गावकऱ्यांचाही इथली झाडं तोडण्याला विरोध आहे. काचले गावातले डॉ. संजीव गोखले यांच्या मते, रायगडला येण्यासाठी आणखी एक चांगला पर्यायी रस्ता आहे. माणगावहून किल्ले रायगडाकडे येणारा रस्ता एकही झाड न तोडता रुंद करण्यात येतोय. हा पर्याय असताना इथली वृक्षतोड कशासाठी, हा त्यांचा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2020 08:56 PM IST

ताज्या बातम्या