पुणे, 26 मार्च : कोरोनाचा (Coronavirus) धोका रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आलं. त्यानंतर नागरिकांना घराबाहेर पडण्यावर बंधने लादण्यात आली आहेत. अनेकांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारला. यादरम्यान हातावर पोट असणाऱ्या, रोजंदारीवर जगणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत.
पूर्वी आम्ही भीक मागून लोकांकडून शिळे अन्न आणायचो आता कोरोनामुळे लोक जवळ येऊ देत नाही. एक दिवसाआड आम्ही जेवतो, असं मन हादरवून टाकणारं मनोगत पुण्यातील वडगाव - मावळ या भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांनी व्यक्त केलं. त्यांची कहाणी ऐकून मन सुन्न झालं.
राख पसरे वस्ती लोहगाव येथील झोपडीमध्ये राहणाऱ्या आठ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबातील लहान मुलांना भूक लागली तर काय करायचं? त्यांनी काही खायला मागितलं तर काय देऊ ? असा प्रश्न उभा राहिल्याचे येथील महिला सांगतात. दौंड तालुक्यातील पारगाव या मूळ गावचे असणारी ही कुटुंबं मागील अनेक वर्षापासून पुणे शहरात राहतात. येरवडा, धानोरी आणि जकातनाका या भागात दिवसभर ढोल वाजवणे, आसूड घेऊन मारून घेणे अशी कामे स्त्री पुरुष करतात आणि त्याबदल्यात मिळालेल्या पैशावर आपला घरखर्च चालवतात.
संबंधित- VIDEO : लॉकडाऊनमध्ये मशिदीत जाणं पडलं महागात, नमाजनंतर पोलिसांनी अशी केली धुलाई
या कुटुंबातील लहान मुले जवळील वस्तींमध्ये जाऊन शीळं अन्न मागून आपलं पोट भरतात. हाच त्यांचा दिनक्रम असतो. मात्र गेल्या 8 दिवसांपासून त्यांना लोक घरासमोर उभंही राहू देत नाही. शीळचं काय पण एक वेळचं जेवणही त्यांनां मिळेनासं झालं आहे. जे काही सांभाळून ठेवलं होतं ते केव्हाच संपलं. आता तर दुकानदारही उधारी देत नसल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली.
एक दिवस जेवायचं आणि एक दिवस उपाशी राहण्याची वेळ आमच्यावर आली आहे. आमच्यासाठी खाण्याची व्यवस्था करा, नाही तर आम्ही उपाशी मरु, असे येथील पोपट गायकवाड यांनी भावनिक आवाहन केले. अशीच परिस्थिती सोकोरे नगर रामवाडी येथील 20 कुटुंब, लोहगाव येथील 7 कुटुंब, बी आर टी विश्रांतवाडी 5 कुटुंब, फुलेनगर येथील सुमारे 150 कुटुंबाची सुध्दा झाली आहे. भीक मागणे, चालू सुरी धार लावणे, सिग्नल वर वस्तू विकणे असं काम करणाऱ्यांचं काय? लॉकडाऊनमुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांच्या घराची चूल बंद झाली आहे. या भागातील बहुतांशी जनता ही गुलबर्गा कर्नाटक या भागातून 20 वर्षापूर्वीच पुण्यात आली आहे. त्यामुळे या लोकांचे गावाकडचे जाण्याचे रस्ते बंद झाले आहेत असे येथे काम करणाऱ्या जनसेवा फाऊंडेशन येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
शासनाने अनेक वस्त्यांमध्ये जाऊन लोकांना अंत्योदय योजनेअंतर्गत रेशन व्यवस्था केली आहे. पण ज्यांच्या कडे रेशन कार्ड नाही, ज्यांना घरी लाईट, पाणी, घर नाही अशांच्या बाबतीत काय? त्यांना तर आपण कोरोनाआधी भुकेने मरुन जाऊ अशी भीती निर्माण झाली आहे. अशा नागरिकांसाठी सामाजिक संस्था व स्थानिकांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन केले जात आहे.
संबंधित - लॉकडाऊनमधील सर्वात भयंकर बातमी, कंटेनरमध्ये कोंबून 300 मजुरांचा अमानवीय प्रवास
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india