नंदूरबार, 2 जानेवारी : महाराष्ट्रात प्रत्येक भागातील खाद्यसंस्कृतीचं खास वैशिष्ट्य आहे. सर्व भागांमध्ये काही खास पदार्थ मिळतात. हे पदार्थ त्यांच्यातील वेगळेपणानं त्या भागाची खास ओळख बनली आहे. खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यात लांडगे हा प्रसिद्ध खाद्य पदार्थ मिळतो. हा लांडगे पदार्थ खाण्यासाठी चांगला चविष्ट असल्यामुळे या परिसरात चांगला प्रसिद्ध आहे. याच लांडगे पदार्थाची रेसिपी सुगंधा पाटील यांनी आपल्या सर्वांसाठी सांगितली आहे. लांडगे बनविण्यासाठी लागणारे साहित्य 1) तुरडाळ- एक वाटी 2) चणा डाळ- अर्धी वाटी 3) मूगडाळ- अर्धी वाटी 4) लसूण पाच ते सात पाकळ्या 5) थोडेसे अद्रक 6) जिरे 7) धने बडिशोप पूड 8) मीठ 9) बारीक चिरलेली कोथिंबीर 10) कढीपत्ता 11) खोबरे कीस 12) मोहरी 13) तेल 14) हळद 15) लाल तिखट 16) दोन हिरवी मिरची 17) बारीक चाळणीने चाळलेले गव्हाचे पीठ
कृती सुरुवातीला तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ व मुगाची डाळ चार तास पाण्यात भिजवणे. नंतर त्याला मिक्सर मधून रवाळ दळून घेणे. लसूण, हिरवी मिरची, अद्रक व जिरे यांची पेस्ट करणे व ती पेस्ट या डाळीच्या सारणात एकत्र करणे. चवीनुसार मीठ, हळद, चटणी, थोडीशी हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सर्व पदार्थ त्या पेस्टमध्ये टाकून पेस्ट एकजीव करणे. नंतर बारीक चाळलेल्या पिठाला तेलाचे मोहन देणे. थोडेसे मीठ व हळद त्यात टाकून त्याची थोडी घट्ट अशी कणीक मळणे. त्या कणकेला पाच ते सात मिनिट झाकून ठेवणे. नंतर त्या पिठाचा थोडासा लहान गोळा घेऊन पोळी सारखी गोल पण बारीक पोळी लाटून त्यावर वरील डाळींचे सारण पसरवणे. थोडासा जाडसर थर देणे व त्याचा रोल बनवणे. अशाप्रकारे आठ ते दहा रोल बनल्यानंतर त्यांना उकळत्या पाण्यावर वाफवण्यासाठी ठेवणे. दहा ते पंधरा मिनिट वाफ दिल्यानंतर ते चांगल्यापैकी शिजून जातात. ते शिजल्यावर गॅस बंद करणे व गाळणीतील रोलमधील वाफ जाऊ देण्यासाठी बाहेर काढणे व वाफ निघून गेल्यानंतर त्याला पसरट भांड्यात काढून ठेवणे व त्याचे सूरीच्या साहाय्याने छोटे छोटे रोल कापणे.
आता तुम्हीही बनवा, खापरावरची पुरणपोळी म्हणजेच खान्देशी मांडे! पाहा Video
हे सर्व रोल कापले गेल्यावर फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवून त्यात मोहरी, तीळ, हिरवी मिरची टाकने. फोडणी पक्की झाल्यानंतर त्यात कापलेले रोल टाकने व फ्राय करणे. डीश मध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, खोबऱ्याचा किस टाकून आपण ती डिश सजवू शकतो. व गरमागरम लांडगे खाण्याची मजाच वेगळी असते. अशाप्रकारे लांडगे तयार केले जातात या लांडग्यांना टोमॅटो सॉस किंवा घरगुती खोबऱ्याची चटणी सोबत आपण खाऊ शकतो. या लांडग्यांना बनवताना आपण डाळी भिजवून बनवल्यामुळे हा पदार्थ अधिक पौष्टिक बनतो.