नियम धाब्यावर; परवानगी नसताना रुग्णालयात कोविड बाधितांवर उपचार, दोन दिवसांत दोघांचा मृत्यू

नियम धाब्यावर; परवानगी नसताना रुग्णालयात कोविड बाधितांवर उपचार, दोन दिवसांत दोघांचा मृत्यू

शासनाची परवानगी नसतानाही कोरोना रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर रत्नागिरीतील एका रुग्णालयात उपचार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

रत्नागिरी, 13 एप्रिल : जिल्ह्यातील खेड (Khed) तालुक्यामध्ये भरणे याठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परवानगी नसतानाही कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांत दोन कोरोनाग्रस्त महिलांचा मृत्यू (Covid patient died) झाला आहे. एसएमएस हॉस्पिटल नावाच्या या हॉस्पिटलमध्ये शासनाची परवानगी नसतानाही (Treatment to covid patient without permission) कोरोना रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारनं उपचार पद्धती ठरवून दिलेली आहे. शिवाय कोरोना रुग्णांवर उपचारासाठी त्यासंबंधीची सरकारची परवानगीही हॉस्पिटलकडे असणं गरजेचं आहे. पण खेडमधल्या भरणे इथं एसएमएस हॉस्पिटलने हे सर्व  नियम धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळत आहे. कोणतीही शासन परवानगी नसताना याठिकाणी रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णालयात गेल्या दोन दिवसांत दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला आहे. सध्या जवळपास 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर याठिकाणी उपचार सुरु आहेत अशी माहिती समोर आली आहे.

(वाचा - लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानं नवरा झाला सेक्स वर्कर; बायकोनं केली धक्कादायक मागणी)

विशेष म्हणजे विनापरवानगी कोरोना रुग्णांवर उपचाराबरोबरच कुठल्याही प्रकारची खबरदारीही रुग्णालय घेत नसल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचे रुग्ण असलेल्या वॉर्डात इतरही लोक बिनधास्त फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. याठिकाणी डॉक्टर किंवा नर्सेसला पीपीई किट देखिल नसल्याचं समोर आलं आहे. नातेवाईक आयसीयूमध्ये ये-जा करत असल्याचंही आढळून आलं. कोरोना रुग्णांना भेटल्यानंतर लोक थेट बाजारात किंवा इतरत्र जात आहेत, त्यामुळं कोरोना संसर्गाचा धोका बळावतो आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णावर उपचारासाठी एमडी फिजिशियन डॉक्टरची गरज असते. पण याठिकाणी बी.ए.एम.एस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत.

(वाचा-Ground Report: 'ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो', वसई-विरारचं भीषण वास्तव)

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे कोविड कमांडिंग अधिकारी डॉ. संभाजी गरुड यांच्याशी याबाबत संपर्क केला असता, भरणे येथील एसएमएस हॉस्पिटलला कोविड सेंटर चालवण्याची परवानगी असल्याची अधिकृत माहिती नाही असं ते म्हणाले. जिल्हा शल्य चिकित्सकांशी बोलून या रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्ण शासकीय कोविड रुग्णालयात हलवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजन शेळके यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत, एसएमएस हॉस्पिटलला तोंडी परवानगी असल्याची हास्यास्पद माहिती दिली. मात्र, एसएमएस हॉस्पिटलची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाहीये.

एकूणच अशाप्रकारे परवानगी नसताना कोविड रुग्णांवर उपचार करून त्या रुग्णांबरोबर हॉस्पिटल कर्मचारी आणि नातेवाईकांसह इतरांचा जीवही धोक्यात घातला जात आहे. त्यामुळं अशा हॉस्पिटल्सवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.

Published by: News18 Desk
First published: April 13, 2021, 6:45 PM IST

ताज्या बातम्या