कन्हैया खंडेलवाल,हिंगोली, 21 जून : हिंगोली जिल्ह्यातील देवाळा गावाजवळ दोन गटात तुफान राडा झाला आहे. यामध्ये एक दुचाकी पेटवून देण्यात आली असून एक जण जखमी झाला आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील जवळील एका हॉटेल जवळ हिंगोली शहरातील एक गट व अन्य एका गटामध्ये काही कारणास्तव शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर हा वाद वाढल्याने दोन्ही गटातील तरूण दुचाकीवरून हिंगोली – लाख मार्गावरील देवाळा गावाच्या समोर येऊन थांबले.
या दोन्ही गटात पुन्हा बाचाबाची झाली व वाद निर्माण झाला, या राड्यात एका तरुणाच्या डोक्याला दगड लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. तर एक स्कुटी जाळून टाकण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध दुचाकी जळत असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
हेही वाचा -सुशांतच्या आत्महत्येबाबत होणाऱ्या आरोपांनंतर सलमान खानने सोडलं मौन, सहा दिवसांनंतर म्हणाला...
दरम्यान, घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाले. जळत असलेली दुचाकी पाणी टाकून विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र यामध्ये संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.