जगातील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण म्हणजे चेरापुंजी आणि या चेरापुंजीलाही मागे टाकत साताऱ्यातील कोयनानगरच्या नवजा गावाने तुफानी पाऊस पाहिला आणि नवा इतिहास रचला. अर्थात या अतिवृष्टीची प्रचंड मोठी किंमत या गावाला मोजावी लागली आहे.
यावर्षी सातारा जिल्ह्यातल्या नवजामध्ये एका दिवसात 746 मिलिमिटर एवढा उच्चांकी पाऊस पडला. यानंतरचं चित्र पाहून मात्र डोळ्यात अश्रू आणणारा हा पाऊस होता हे पटेल.
साताऱ्यातील कोयनानगर येथील नवजामध्ये 23 जुलैला निसर्गाचं रौद्र रूप दिसलं. एका दिवसात 746 मिलिमिटर पाऊस झाला.
नवजा परिसरात झालेल्या उच्चांकी पावसाने या परिसरातील शेतीचं तर मोठं नुकसान केलंच आहे पण त्याहून अनेकांना बेघर देखील केलं आहे.
आता कोयनानगरमधल्या डोंगरतळाच्या अनेक गावांतून लोकांचं स्थलांतरं सुरू असून डोक्यावर सुरक्षित छप्पर शोधण्याची धडपड सुरू आहे.
सरकारने झालेल्या नुकसानीचे लवकर पंचनामे करून मदत जाहीर करावी आणि आमचं पुनर्वसन कराव अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
साताऱ्यात यापूर्वी पाटण तालुक्यातील पाथरपूंज आणि लामज या गावात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे आणि यापाठोपाठ आता नवजा मध्ये सर्वात जास्त पाऊस पडला आहे.
. यामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची ठिकाण बदलत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार हा सर्व प्रकार ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत आहे.