'ग्रामीण भागातील महिलांचा आकांत पाहा', राज ठाकरे यांच्या वाईन शॉप सुरू करण्याच्या मागणीला विरोध

'ग्रामीण भागातील महिलांचा आकांत पाहा', राज ठाकरे यांच्या वाईन शॉप सुरू करण्याच्या मागणीला विरोध

राज ठाकरे यांनी केलेल्या वाईन शॉप उघडण्याच्या सूचनेला आता विरोध होऊ लागला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 25 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वाईन शॉप उघडण्याच्या सूचनेला आता विरोध होऊ लागला आहे. 'महसुलाऐवजी ग्रामीण भागातील महिलांचा आकांत पाहा. दारू विक्री सुरू झाली तर अनेक कुटूंब कोरोनाच्या संकटकाळात उद्धवस्त होतील. कौटुंबिक हिंसाचार वाढेल,' असं म्हणत दारुबंदी कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी राज ठाकरेंच्या मागणीला विरोध केला आहे.

'महसूलच हवा असेल तर शासकीय कर्मचारी वेतनात 10 टक्के कपात करावी. आमदारांच्या निधीतही कपात करावी. दारु विक्रीच्या माध्यमातून जेवढा महसूल मिळतो त्यापेक्षा जास्त महसूल वेतन कपातीतून मिळू शकेल,' असं मत हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे. आज सकाळी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामानातून राज ठाकरेंच्या मागणीला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्तेही या मागणीला विरोध करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

काय होती राज ठाकरे यांची मागणी?

'खडखडाट झालेल्या राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. जवळपास 18 मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी 31 मार्च मग पुढे 14 एप्रिल आणि आता3 मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान 'वाईन शॉप्स' सुरु करून, राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे?

'वाईन शॉप्स' सुरू करा ह्याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा हा आहे. हा विषय निव्वळ राज्याच्या महसुलाचा आहे, जो पूर्ण आटला आहे. आज पेट्रोलपंप जवळपास बंद आहेत, राज्यातील जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत, आणि दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला 41.66 कोटी, महिन्याला 1250 कोटी आणि वर्षाला 15 हजार कोटी मिळतात. आता जवळपास राज्य 35 दिवस टाळेबंदीत आहे आणि पुढे किती दिवस राहील ह्याचा अंदाज नाही ह्यावरून आपण किती महसूल गमावलाय आणि गमावू याचा अंदाज येईल.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 25, 2020, 3:48 PM IST

ताज्या बातम्या