राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 11 जून: राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसात अनेक दुर्घटना घडत असल्याचं वृत्त समोर येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील (Mehkar Tehsil Buldhana) अंजनी (Anjani) येथे झालेल्या मुसळधार पावसाने घराची भिंत कोसळली (wall collapsed). भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका 3 वर्षीय बलिकेचा मृत्यू (3 year child died) झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामध्ये मेहकर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अंजनी बु येथील मनवर खा मस्तान खा पठाण यांच्या घराची भिंत कोसळली. भिंत कोसळून 3 वर्षांची चिमुकली आशिया पठाण ही भिंती खाली दबली, तिला बाहेर काढून उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असतांना रस्त्यात तिचा मृत्यू झाला. तर घरातील इतर तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये घराचे आणि घरातील साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. तर चिमुकलीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मुंबईत सलग दोन दिवस दुर्घटना मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे बुधवारी मालवणी परिसरात एका इमारतीचा भाग शेजारील घरांवर कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी दहिसर येथे ती घरे कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.