Home /News /maharashtra /

अकोल्यात पावसाचं थैमान; अतिवृष्टीने 8 हजार 657 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

अकोल्यात पावसाचं थैमान; अतिवृष्टीने 8 हजार 657 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अकोल्यात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

अकोला, 9 सप्टेंबर : अकोला जिल्ह्यात (Akola District) गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) सुरू आहे. या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop damages) झाले आहे. 195 गावांमध्ये 8 हजार 657 हेक्टर क्षेत्रावर पिके बाधीत झाले आहेत. बाधीत झालेल्या पिकांत प्रामुख्याने सोयबीन, कापूस, मुग, उडीद, तूर या पिकांचा समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. अद्याप पंचनामे करण्याचे काम सुरु आहे, असेही जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, अकोला तालुक्यात 21 गावांमध्ये 1 हजार 347 हेक्टर क्षेत्रावर, मुर्तिजापूर तालुक्यात 33 गावांमध्ये 443 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना, अकोट तालुक्यात 102 गावांमध्ये 2 हजार 647 हेक्टर क्षेत्रावर, तेल्हारा तालुक्यात 24 गावांमध्ये 3 हजार 400 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे असे एकूण 195 गावांमध्ये 8 हजार 657 हेक्टर क्षेत्रावर पिके बाधीत झाले आहेत. अद्याप पातूर व बार्शीटाकळी या तालुक्यात पिके बाधीत झाल्याची माहिती नाही. जिल्ह्यातील पूरस्थिती अकोला तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे. पूर्णा नदीस आलेल्या पुरामुळे 600 लोकसंख्या असलेल्या दोनवाडा या गावाचा संपर्क तुटला होता. त्यामुळे गावातील 30 जणांना आपत्ती निवारण कृती दलाच्या जवानांनी सुरक्षित स्थळी हलविले आहे. या लोकांची जवळच म्हातोडी गावातील शाळेत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगत फसवणूक, मनोहर मामा भोसलेंसह तिघांवर गुन्हा दाखल दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला दरम्यान 6 सप्टेंबर रोजी पारडी येथे काटेपूर्णा नदीत गोपाल महादेव कांबे 19 वर्ष व सागर गोपालराव कावरे 21 वर्ष हे दोघे वाहून गेले. त्यांचे शोधकार्य आपत्ती निवारण कृती दलाच्या जवानांमार्फत सुरु आहे. त्यापैकी गोपाल महादेव कांबे यांच्या मृतदेहाचा शोध लागला आहे. आज दिवसभर हे शोधकार्य सुरु होते. आपत्ती निवारण कृती दलाचे पथक नागपूर येथून आले असून त्यांच्या दोन तुकड्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यापैकी एक पथक हे दोनवाडा येथील बचाव कार्यासाठी कार्यरत आहे. दरम्यान गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी वाहन असून अकोला –अकोट रस्ता बंद आहे. तर अकोला- म्हैसांग- दर्यापूर हा मार्ग आज दुपारपासून सुरु झाला आहे. बार्शीटाकळी तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे तथापि, कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. तालुक्यातील राजंदा मंडळात 80.05 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मौजे एरंडा या गावात भिंत कोसळून शामराव अप्पा पवार 70 वर्ष या इसमाचा मृत्यू झाला तर गावातील दोन घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. अकोट तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. तालुक्यातील आसेगाव बाजार येथील 72 घरे, रौदळा येथे 60 तर वरुर येथील एका घरात नाल्याचे पुराचे पाणी जाऊन नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. तेल्हारा तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून नेर, सांगवी, पिवंदळ या गावांचा संपर्क तुटला आहे. व्याळा मंडळात 85 घरांचे नुकसान बाळापूर तालुक्यात बाळापूर मंडस्ळात 71.03 मि.मी तर व्याळा मंडळात 76 मि.मी पावसाची नोंद झाली. शेगाव निंबा अकोट या मार्गावरील अंदुरा येथे पुलावरुन पूर्णा नदीचे पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. व्याळा मंडळात 85 घरांचे नुकसान झाले असून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे. हाता येथेही काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे. पातुर तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आलेला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. मुर्तिजापूर तालुक्यात सहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यात 33 घरांचे नुकसान झाले आहे मात्र कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही असे कळविण्यात आले आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Akola, Rainfall

पुढील बातम्या