जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बापरे! ढगफुटीसारखा पाऊस, 40 ते 50 एकरातील अंकुरलेली पिकं वाहून गेली

बापरे! ढगफुटीसारखा पाऊस, 40 ते 50 एकरातील अंकुरलेली पिकं वाहून गेली

बापरे! ढगफुटीसारखा पाऊस, 40 ते 50 एकरातील अंकुरलेली पिकं वाहून गेली

पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, शेतांचे बांध देखील फुटून मातीसह अंकुरलेली पिकं वाहून गेली आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

भुसावळ, 14 जुलै: जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द परिसरात सोमवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे सुरवाडे पंचक्रोशीतील सुमारे 40 ते 50 एकर शेती क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, शेतांचे बांध देखील फुटून मातीसह अंकुरलेली पिकं वाहून गेली आहेत. कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद-मूग पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. हेही वाचा… कोल्हापुरात भाजपविरुद्ध भाजप! पाणी देण्यावरून 4 तालुक्यातील शेतकरी आक्रमक जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात सोमवारी रात्रीच्या सुमारास पाऊस पडला. त्यात बोदवड तालुक्यातही ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुरवाडे खुर्द परिसरात रात्री 11 वाजेनंतर मुसळधार पाऊस झाला. सुरुवातीला कमी मात्र नंतर पावसाचा जोर खूप होता. मध्यरात्रीनंतर 2 वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. याठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतातील अंकुरलेली पिके वाहून गेली आहेत. काही शेतकऱ्यांच्या कापसाच्या शेतातील कापसाचे पीक तर वाहून गेलेच, शिवाय कापसाच्या शेतातील ठिबक सिंचन संच देखील वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. सुरवाडे खुर्द येथील निलेश जगन्नाथ शिंदे, प्रकाश शिंदे, गणेश शिंदे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने केलेल्या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोदवडचे तहसीलदार यांनी मंगळवारी सकाळी सुरवाडे खुर्द परिसराला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून पंचनाम्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती यावेळी तहसीलदारांनी दिली. शासनाकडून आम्हाला त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. हेही वाचा… सचिन पायलट यांना बंड पडले भारी, उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवलं पशुधनाची देखील मोठी हानी… सुरवाडे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाची देखील मोठी हानी झाली आहे. सुरवाडे येथील शेतकरी प्रकाश कडू पाटील यांचा एक बैल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. नाल्याच्या पाण्यात हा बैल मृतावस्थेत आढळला आहे. तहसीलदारांनी या घटनेचाही पंचनामा करण्याचे आदेश तलाठ्याला दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात