नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 7 नोव्हेंबर : अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला. पण, त्यांच्या विजयावरून श्रेयवादाची लढाई भाजप आणि शिंदे गटात सुरू झाली आहे. ‘ज्या दिवशी भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली होती, त्याच दिवशी लटकेंचा विजय निश्चित झाला होता’ असा दावाच शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके या विक्रमी मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपने आधीच माघार घेतल्यामुळे भाजप थोडक्यात बचावली. पण, लटकेंच्या विजयावर भाजप आणि शिंदे गटामध्ये चढाओढ सुरू झाली. (‘सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकतं, पण निर्णय…’, विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं…) ‘ज्या दिवशी भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली होती, त्याच दिवशी लटकेंचा विजय निश्चित झाला होता. सर्व पक्षांनी ऋतुजा लटकेंना पाठिंबा दिला होता, त्यामुळे साहजिकच त्यांचा विजय निश्चित होता, अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काही मतं नोटालाही पडली. नोटाला दुसऱ्या पसंतीची मतं मिळाली, असं सांगत त्यांनी ठाकरे गटाला टोलाही लगावला. सुषमा अंधारेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख नटी म्हणून केला होता. गुलाबराव पाटील यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युतर दिलं आहे. गुलाबराव पाटील यांचा माज संविधानिक पद्धतीने उतरवणार, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. (‘हा धृतराष्ट्र नाही तर…’, फडणवीसांच्या ‘खंजीर अन् बदला’वर ठाकरेंचा पलटवार) ‘गुलाबराव पाटील ज्या पातळीवर उतरले त्यावर मी उतरू शकत नाही. तुम्ही अश्लाघ्य आणि सवंग टिप्पणी करून माझ्या बाईपणावर हल्ला करण्याचा आणि मला नामोहरम करण्याचा जो बालीश प्रयत्न करत आहात, त्यावरून मला तुमची कीव करावीशी वाटते, तुमची भाषा तुमचा माज दाखवणारी आहे. परंतू मी बाईपणाचं कोणतंही व्हिक्टीम कार्ड खेळणार नाही. तुमचा सरंजामी माज संविधानिक पद्धतीने उतरवून दाखवेन,’ असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.