गुहागर, 25 डिसेंबर : अल्पवयीन मुलीच्या विवाहाच्या 15 दिवसांनंतर ती 5 महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक बाब गुहागरमध्ये समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंब हादरून गेलं असून मुलाच्या घरच्यांनी गुहागर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
लग्न झालेली अल्पवयीन मुलगी गुहागरमधील मासू गावची असल्याची माहिती आहे. सदर मुलीचं चिपळूणमधील मार्गताम्हाणे गावातल्या मुलाशी काही दिवसांपूर्वीच लग्न झालं. या लग्नानंतर दोन्हीही कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. मात्र लग्नाच्या बरोबर 15 दिवसानंतर दोन्ही कुटुंबाला हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन अन् इमारतीत सुरू होती देहविक्री, अखेर 2 तरुणीसह महिलेची सुटका
पीडित मुलीला वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात नेलं असतं ती 5 महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. मुलाच्या कुटुंबियांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर गुहागर पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर अल्पवयीन मुलीवर लग्नाआधी कोणी लैंगिक अत्याचार केले होते का, या अनुषंगानेही पोलीस तपास केला जाण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.