**लक्ष्मण घाटोळ,**नाशिक, 30 जून : नाशिक शहरातील वाढती कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यापुढे सायंकाळी 7 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजेनंतर विनाकारण घराबाहेर पडणार्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता राज्य शासनाने 31 जूलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्याचधर्तीवर नाशिकमध्येही लॉकडाऊन होणार का असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. याबाबत शहरात वेगवेगळया चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शासकिय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर बोलतांना भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात 4 हजारहून अधिक रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात 103 रूग्णांची प्रकृती गंभीर आहे.जिल्हयात आतापर्यंत कोरोना आजाराने 236 जणांचा मृत्यू झाला यात 99 मृत्यू नाशिक शहरात झाले. यातील 136 लोकांचे वयोमान हे 40 ते 45 वर्ष वयोगटातील असून तरूणांचा मृत्युदर 60 टक्के असल्याने ही गंभीर बाब आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. शहरातील व्यापारी संघटनांनीही सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आपली दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 5 वाजेनंतर आपोआपच गर्दी कमी होण्यास मदत होईल. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात जिल्हा रूग्णालयात डॉक्टर्स तसेच पॅरामेडीकल स्टाफची कमतरता आहे. मध्यंतरी भरती प्रक्रियाही राबवली गेली मात्र दोनशे डॉक्टरांपैकी अवघे 30 डॉक्टर्स रूजू झाले त्यामुळे आता रूग्णांच्या उपचारासाठी शहरातील खाजगी डॉक्टर्स तसेच तज्ञ डॉक्टरांची सेवाही अधिग्रहीत करण्यात येणार असल्याचेही भुजबळ सांगितले. तसेच अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या निर्बंधांचे उल्लंघन होताना दिसते जसे, दुचाकीवर एकाच व्यक्तीला परवानगी असताना तीन तीन जण प्रवास करताना दिसतात. यापुढे अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल शिवाय गर्दीच्या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्याबाबतचे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आल्याचे भुजबळांनी सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदि उपस्थित होते. खासगी रूग्णालयाच्या मनमानीला चाप खासगी रूग्णालयांमध्ये उपचार घेणार्या रूग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारींबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले की, यापुढे महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून खाजगी रूग्णालयांचे संचलन केले जाईल. या रूग्णालयांमध्ये करोना रूग्णांसाठी राखीव बेड कोणत्या रूग्णांना द्यायचे याचा निर्णय आता प्रशासन घेईल तसेच प्रत्येक खाजगी रूग्णालयात महापालिकेमार्फत एक संपर्क अधिकारी नियुक्त केला जाईल रूग्ण किंवा नातेवाईकांनी या कर्मचार्यांशी संपर्क करून आवश्यक ती मदत घेण्याबाबतचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. कोरोनाची लढाई आपल्या सर्वांना मिळून लढाईची आहे. त्यामुळे कृपया कारवाईची वेळ येऊ देऊ नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले. संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.