मुंबई, 01 डिसेंबर : राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची घोषणा 9 नोव्हेंबर 2022 ला दिल्या. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 28 नोव्हेंबर पासून निवडणूकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. दरम्यान 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील सर्वच इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
यावर ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांना माहिती देण्यात आली आहे.
हे ही वाचा : राष्ट्रवादीने जातीच्या राजकारणासाठी वापरलं शिवरायांचं नाव, राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
निवडणूक आयोगाने विशेष आदेश जारी करत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचा आदेश मागे घेत ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या काळात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सूचना देण्यात आली होती.
या आदेशात दुरूस्ती करत नामनिर्देशनपत्र पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे. अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी देण्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती.
हे ही वाचा : भाजप आमदार लोढांनी केली मुख्यमंत्र्यांची शिवरायांशी तुलना, केसरकरांनी केली पाठराखण
राज्यातील 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. अहमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी,पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,सोलापूर, वर्धा,ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यातील गावांमध्ये ही निवडणूक होणार आहे. 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elections, Gram panchayat, Sarpanch election