ऋचा कानोलकर, प्रतिनिधी मुंबई, 14 एप्रिल : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती आहे. यानिमित्त देशभरामध्ये त्यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र, त्यांच्या साहित्याकडे दुर्लक्ष झाल्याची ही एक खंत आजही आहे. गोरेगावच्या 89 वर्षीय रमेश शिंदेंनी आजवर बाबासाहेबांच्या 4500 पु्स्तकांचा संग्रह जपला आहे. अतिशय दुर्मिळ पुस्तकं, ऐतिहासिक पत्र त्यांनी एकट्यानं सांभाळली आहे. अनेकदा मागणी करूनही सरकार या पुस्तकांसाठी जागा देऊ शकलं नाही. याबाबत न्यूज18 लोकमतनं घेतलेला हा विशेष आढावा.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी आपलं आयुष्य समाजप्रबोधनासाठी अर्पण केलं. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्यानं लिहिले नसावेत इतके ग्रंथ, पुस्तकं, प्रबंध, लेख बाबासाहेबांनी लिहिले. गोरेगावमध्ये राहणाऱ्या 89 वर्षीय रमेश शिंदे यांनी हे सर्व साहित्य जपलंय. ते शाळेनंतर बाबासाहेबांची भाषणं ऐकायला जात, अगदी शालेय जीवनापासून त्यांनी बाबासाहेबांच्या पुस्तकं जमवायला सुरुवात केली. नोकरी करत असताना सुट्टीच्या दिवशी ते पुस्तकं विकत घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचे. पुणे, सोलापूर, औरंगाबाद, असं करत करत संपूर्ण महाराष्ट्र खास पुस्तकांसाठी त्यांनी पालथा घातला, ज्यामुळे आज त्यांचं संपूर्ण घर या पुस्तकांनी भरून गेलंय. यामध्ये बाबासाहेबांनी संपादन केलेल्या मूकनायक, जनता आणि प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रसुद्धा आहेत. हा सर्व ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी या साहित्याला जोपासण्यासाठी एक लहानसं ग्रंथालय मिळणं गरजेचंय, ज्यासाठी सरकारचा हातभार लाभावा यासाठी रमेश शिंदे प्रयत्नशील आहेत. आंबेडकर जयंतीच्या दिवशी भीमसैनिकांनी खास भेट, उभारला तब्बल 125 फूट उंच पुतळा, PHOTOS रमेश शिंदे हे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट इथं नोकरी करायचे. फावल्या वेळात त्यांनी अनेक पुस्तकं विकत घ्यायला सुरुवात केली. खास पुस्तकं विकत घेण्यासाठी ते सोलापूर, पुणे, कोल्हापूर, महाड अशा अनेक ठिकाणी जायचे. जवळजवळ पुस्तकांसाठी त्यांनी महाराष्ट्र पालथा घातला. ग्रंथ माणसाला शहाणे करतात. पुस्तकं ज्ञान देतात. पुस्तकांमुळे बुद्धी सुपीक होते, असं रमेश शिंदे यांचं मत आहे. डॉ. बाबासाहेब यांनी केलेल्या कार्यावरून वाचन हे कशाप्रकारे समाज घडवू शकतं, हे आपण आजवर पाहिलं. आज ग्रंथ कुणी वाचत नाही, विकतही घेत नाही, अशी खंत रमेश शिंदे यांनी व्यक्त केली. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले या सर्वांनी देश घडवला. त्या सर्वांचे ग्रंथ वाचणं गरजेचंच आहेत, असं आवाहन शिंदे यांनी सर्वांना केलं. रमेश शिंदे यांनी आपल्या घरी जपून ठेवलेल्या पुस्तकांमध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकं आहेत. 1898 साली कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी लिहिलेलं गौतमबुद्धांचं चरित्र हे पहिलं पुस्तक आहे, जे वाचल्यानंतर बाबासाहेबांना बौद्ध धर्माबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि त्यांनी बौद्ध धर्माविषयी अभ्यासाला सुरुवात केली. ते पुस्तकही शिंदेंनी जपून ठेवलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1940 साली लिहिलेलं, पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया, दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया, द प्रोब्लेम ऑफ द रूपी: इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन, काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले, थॉट्स ऑन पाकिस्तान, गोलमेज परिषद आणि संविधान सभेतील भाषांच्या मूळ प्रती, त्याचसोबत बाबासाहेब आंबेडकरांची मूळ हस्तलिखित पत्रे, प्रबंध भाषणे अशा सर्व साहित्याचा संग्रह त्यांनी जपला आहे. फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचीच नाही तर प्रबोधनकार ठाकरेंच्यासुद्धा अनेक पुस्तकांचा ठेवा त्यांच्याकडे आहे. पुस्तकांना अन्नाहूनही अधिक महत्त्व देणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांशी तेही प्रेरित आहेत. साहित्याचं आयुष्यातील स्थान त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. “शिका आणि संघटित व्हा” हे बाबासाहेबांचं वाक्य त्यांना आजही प्रेरणा देत आहे. फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरच नाही तर महात्मा जोतिराव फुले, प्रबोधनकार ठाकरे यांचाही पुस्तकसंग्रह शिंदेंनी जपला आहे. प्रबोधनकारांचा पुस्तकसंग्रह जपल्याबद्दल प्रबोधनकारांनी स्वत: आभार मानणारं पत्र रमेश शिंदेंना लिहिलं होते. इतक्या जास्त संख्येत असलेल्या साहित्याचा सांभाळ एकट्यानं करणं सोपं नाही. अनेकदा त्यांना काही अडचणींना सामोरं जावं लागलं. 26 जुलै 2005 साली आलेल्या महापुरात त्यांची अनेक पुस्तकं वाहून गेली, पानं भिजली. त्यावेळी पुस्तकांचं, प्राचीन साहित्याचं नुकसान झालं. तेव्हाही काही राजकीय नेते त्यांना भेटायला जरूर आले. मात्र, मदतीचा हात कुणीच दिला नाही. या थरथरणाऱ्या हातांनीच इतिहास जोपासला आहे. पण आता या हातांनाही आधाराची गरज आहे, पुस्तकांना जागेची गरज आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खरी संपत्ती त्यांचं साहित्य आणि ते वयाच्या 89 व्या वर्षीही रमेश शिंदेंनी जीवापेक्षा जास्त जपलं आहे. सरकारला अनेकदा पत्रव्यवहार करून कोणतीही दाद न मिळाल्याची रमेश शिंदे यांना खंत आहे. आता पुस्तकांचा सांभाळ व्हावा जेणेकरून अभ्यासक, विद्यार्थी आणि पुढील पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचेल, ही रमेश शिंदे यांची एकमेव इच्छा आहे.