नाशिक, 4 एप्रिल : गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. गौतमी एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना चोरून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आणि तो व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. याप्रकरणी आता गौतमी पाटील पहिल्यांदाच मीडियासमोर आली आहे.
व्हिडिओ व्हायरल झाला त्याबद्दल कायदेशीर कारवाई चालली आहे, मी त्याबाबतीत काही बोलू शकत नाही. माझं त्याबाबतीत बोलणं सुरू आहे, मी काहीही बोलणार नाही, असं म्हणत गौतमी पाटीलने यावर बोलायला नकार दिला.
तुमच्या कार्यक्रमात प्रेक्षक हुल्लडबाजी करतात, त्यामुळे वाद होतात. प्रेक्षकांना काय आवाहन कराल? असा प्रश्नही गौतमी पाटीलला विचारण्यात आला. तेव्हा माझी मनस्थिती नसतानाही मी तुमच्यासमोर आली आहे, असं उत्तर गौतमी पाटीलने दिलं.
सोशल मीडियावर गौतमी कमबॅक हा ट्रेण्ड सुरू आहे, त्याबद्दल छान वाटतंय. प्रेक्षक आणि लोक आपल्यासोबत आहेत याचा खूप अभिमान आहे. तसंच आपल्याला त्यांची साथ आहे या गोष्टीचं खूप छान वाटतंय.
गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमात कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर साताऱ्यातील तरूणाईनं नाराजी व्यक्त केली होती. शिवाय नेटकरी देखील तिच्या पाठिशी उभे राहिले. त्यांनी अशाप्रकारचा व्हिडिओ व्हायरल करून कोणत्याही मुलीची बदनामी करू नये.
गौतमी पाटीलच्या लावणीचा वाद हा मागील काही काळात महाराष्ट्रात सर्व स्तरात चर्चेचा मुद्दा ठरला होता. अगदी सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, कलाकार ते सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर पर्यंत अनेकांनी गौतमीचा वाद कसा महाराष्ट्रातील लावणी कलेला घातक आहे यावर भाष्य केले होते. त्यानंतर तिने माफीही मागितली होती. अलीकडेच गौतमीचा साताऱ्यात कार्यक्रम झाला. यावेळी तिने आपण चुका सुधारत असल्याचं सांगितलं.
दरम्यान काही दिवसांपूर्वी गौतमीच्या लावणीवर स्वतः अजित पवार यांनी सुद्धा आक्रमक प्रवित्रा घेतला होता. लावणी किंवा इतर कोणतेही कार्यक्रम सर्वांना पाहता येतील, अशा प्रकारे आयोजित केले पाहिजे. अशा कार्यक्रमांमध्ये अश्लील प्रकार घडता कामा नयेत. काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांवर बंदी आहे. पण काही जिल्ह्यात असे कार्यक्रम सुरू आहे. मी संबंधितांशी बोलणार आहे. वेळ पडली तर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात हा मुद्दा उपस्थित करणार आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती. यावर गौतमीने दादा मला माफ करा, मी या आधी चुकले पण पुन्हा असं करणार नाही म्हणत अजित पवारांची माफी मागितली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gautami Patil