सोलापूर, 19 सप्टेंबर : ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’, असं म्हणत लाडक्या गणरायाला (Ganesh Visarjan 2021) भक्तीभावाने आज निरोप दिला जात आहे. गेली दहा दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणरायाला निरोप देताना गणेशभक्तांचा कंठ दाटून येतोय. नाशिक आणि सोलापूरमध्ये लहान चिमुरड्यांना गणपती विसर्जनाच्या वेळी रडू कोसळले. देशभरासह राज्यात ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सार्वजनिक गणेश मंडळांना मोठ मोठ्याला मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शांततेत आणि कमी लोकांच्या गर्दीत गणरायाचं विसर्जन होतं आहे. सोलापूरमध्येही आज सकाळपासून ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे.
सोलापुरातील हिप्परगा इथं विहिरीत गणरायाचं विसर्जन केलं आहे. विहिरीजवळ गणरायाला विसर्जनासाठी आणले असता घरच्यांसोबत आलेल्या लहान चिमुरड्यांना रडू कोसळले. विसर्जनासाठी गेल्यानंतर शौर्य आणि सौख्या चन्नेश इंडीया भावंडांना रडू कोसळले. बाप्पाच्या मूर्तीवर डोकं ठेवून दोन्ही भावंड ढसाढसा रडला. चिमुरड्यांचं हे रूप पाहून उपस्थितीतही भावूक झाले होते. तर दुसरीकडे नाशिकमध्येही असाच किस्सा घडला. देवळाली कॅम्प भागात राहणाऱ्या एका कुटु्ंबाने आपल्या लाडक्या बाप्पाचं घरगुती विसर्जन केलं. शाडूच्या मातीची मूर्ती असल्यामुळे पाण्याच्या टबमध्ये तिचे विसर्जन करण्यात आले.
विसर्जन झाल्यानंतर रिदम या चिमुरड्याला मात्र रडू फुटले. ‘माझा बाप्पा मला परत द्या’, असं म्हणून रिदम ढसाढसा रडायला लागला. काहीही करा आणि ‘मला माझा बाप्पा परत हवा’ असा हट्टच रिदमने धरला. रिदमच्या कुटुंबीयांना बाप्पाचं विसर्जन झालं आहे असं समजून सांगितलं पण रिदमचं काही रडणं थांबेना. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.