महेश तिवारी, प्रतिनिधी गडचिरोली, 18 जुलै : गडचिरोली जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. नदी नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरात बोलेरो वाहन वाहुन गेली असुन प्रवाशांनी उड्या मारुन जीव वाचवला आहे. ही घटना काठावर असलेल्या लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. काय आहे घटना? काल रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असुन नदी नाल्यांना पुर आला आहे. एटापल्ली तालुक्यात हेडरीजवळ रस्ता आणि नाल्यावरील पुल पाण्याखाली होता. दोन्ही बाजुने वाहतूक थांबलेली असताना बोलेरो जीप चालकाने नसतं धाडस करुन पाण्याखाली असलेल्या रस्त्यावर बोलेरो वाहन नेले. रस्त्याच्या मधोमध जाताच बोलेरो वाहन पाण्यात वाहुन गेले. प्रसंगावधान राखत 3 प्रवाशांनी उड्या टाकून पाण्यात पोहुन जीव वाचवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
Gadchiroli : पुरातून महिंद्रा पिकअप काढण्याचं नसतं धाडस अंगलट pic.twitter.com/SbjlMtnnwa
— News18Lokmat (@News18lokmat) July 18, 2023
चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शाळा-महाविद्यालय बंद अतिवृष्टीमुळे 19 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालय बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 18 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार दिनांक 18 आणि 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांना 19 जुलै 2023 रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केले असून नागरिकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांना संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. वाचा - गडचिरोलीत पावसाचा हाहाकार, नदीला पूर, 8 मार्ग झाले बंद PHOTOS जिल्ह्यात व शहरात सकाळी आठ वाजता पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सलग आठ तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण चंद्रपूर जलमय झाले आहे. सर्व प्रमुख रस्तावर पाणीच पाणी साचले आहे. खोल भागातील वस्त्या व शेकडो घरात पावसाचे पाणी शिरले आहे.