किशोर गोमाशे, प्रतिनिधी वाशिम, 14 मार्च : वाशिम जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा त्यांची दोन मुले चैतन्य देशमुख आणि नकुल देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गजानन लाटे, रिसोड नगराध्यक्ष विजयाताई आसनकर आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राजेंद्र पाटणी यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळं वाशिम जिल्ह्यासह रिसोड विधानसभेच्या राजकारणामध्ये मोठे बदल दिसणार असून भाजपाची ताकद वाढणार आहे. कोण आहेत अनंतराव देशमुख? अकोला लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. 1979 या कालावधीमध्ये विदर्भातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते सर्वाधिक मतांनी निवडून गेले. त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या दांडग्या जनसंपर्कमुळे 1985 मध्ये विधानसभेत कारंजा मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. याच आमदारकीच्या कालावधीमध्ये त्यांना महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. ते राज्याचे वित्त राज्यमंत्री नियोजन रोजगार हमी योजना माहिती आणि जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री होते. वाचा - ठाकरेंच्या मालमत्तेची चौकशी होणार का नाही? मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय राजीव गांधी पंतप्रधान असताना 1989 आणि 1991 मध्ये ते वाशिम लोकसभा मतदार संघातून निवडूण आले. शरद पवार यांनी 1999 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनंतराव देशमुख यांच्या विरोधात मुंबई येथील जावेद खान यांना उमेदवारी दिली तेव्हा वाशिम लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली व हा काँग्रेस पक्षाची हक्काची असलेले मत ही काहीशी राष्ट्रवादीकडे वळली गेली आणि 1999 च्या निवडणुकीत अवघे 36000 मतांनी अनंतराव देशमुख यांचा पराभव झाला.
अनंतराव देशमुख यांनी भूषवीलेली पदं.. 1- जिल्हा परिषद सदस्य 2- आमदार 3- राज्यमंत्री 4- खासदार 2 वेळा 5- महाराष्ट्र काँगेस प्रदेश उपाध्यक्ष 6- सदस्य AICC दिल्ली