विशाल रेवडेकर, सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग, 8 मार्च : जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करीत असताना ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ हा दगड सापडला आहे. ओरोस येथील जागतिक कीर्तीचे भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू यांनी या दगडाचे वर्णन दुर्मिळ आणि मी आतापर्यंत ज्याच्या शोधात होतो तो’, अशा शब्दांत केले आहे. सतीश लळीत म्हणाले की, एका भटकंतीत वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर आपणाला वजनाने हलकी व पाण्यावर तरंगणारी वस्तू आढळली. दिसायला ही वस्तू दगडासारखी आहे, पण ती सच्छिद्र आहे. प्रथमदर्शनी दगडासारखी दिसणारी, पण पाण्यावर तरंगणारी ही वस्तू नेमकी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू यांची भेट घेतली. ते म्हणाले की, हा ‘प्युमिस’ नावाचा दगड आहे. हा ज्वालामुखीजन्य सच्छिद्र खडक (व्होल्कॅनिक पोरस रॉक) आहे. हा आपल्या भागात अतिशय दुर्मीळ आहे, असे ते म्हणाले. वाचा - तरुणांची दुचाकीवर स्टंटबाजी; समोरून महिला आली अन्.., अंगावर काटा आणणारा अपघात कसा लागला शोध? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे पाण्यावर तरंगणारा दुर्मिळ दगड सापडला आहे. घुंगुरकाठी सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांना वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावर भटकंती करत असताना हा दगड आढळून आला. पाण्यावर तरंगणारा हा दुर्मीळ प्युमिस दगड आहे. हा ज्वालामुखीजन्य सच्छिद्र खडक आहे. जेव्हा समुद्रात पाण्याखाली ज्वालामुखीचा विस्फोट होतो. तेव्हा पृथ्वीच्या अंतर्भागातून लाव्हारस प्रचंड वेगाने आकाशात उंच फेकला जातो. या लाव्ह्यामध्ये अनेक प्रकारचे वायू असतात. पाणी, कार्बनवायू व अन्य वायूंचे विघटन, हवेचा दाब आणि अन्य बाबींमुळे हा लाव्हा घट्ट होऊन दगडात रुपांतरीत होण्यापूर्वी त्यात असंख्य छिद्रे तयार होतात. त्यामुळे या दगडाच्या वस्तुमानांत दगडाचे प्रमाण केवळ 10 टक्के असते व आकारमानात 90 टक्के भाग हा पोकळ व छिद्रमय असतो. यामुळे तो दिसायला मोठा असला तरी वजनाला हलका असतो आणि सच्छिद्र असल्याने पाण्यावर तरंगतो. हा प्युमिस दगड जगाच्या सर्व भागात विशेषतः समुद्रकिनारी आढळतो. आपल्याकडे हा दुर्मिळ असला तरी इंडोनेशिया, जपान, न्यूझीलंड, अमेरिका, रशिया, ग्रीस, इटली आदी देशांमध्ये मोठया प्रमाणात सापडतो. अनेक देशांमध्ये याचा वापर औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. याच्यात काही प्रमाणात औषधी द्रव्येही असतात. त्यामुळे चीनसारख्या देशात हजारो वर्षे त्याचा औषधी वापर होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.